गुटखा वाहतूक आणि विक्री कराल तर थेट मकोका, देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
परराज्यातून अवैध मार्गाने राज्यात मोठ्या प्रमाणात गुटखा आणि सुगंधी सुपारी आणली जाते.
नागपूर : गुटखा उत्पादन आणि विक्रेत्यांची गुन्हेगारी साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मकोका लागू करण्याची घोषणा विधिमंडळ अधिवेशनात केल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) कारवाईसाठी बळकटी येणार आहे.
गुटखाबंदी असतानाही परराज्यातून येणारा अवैध गुटखा व त्याचे शालेय विद्यार्थी व तरुण पिढीवर होणारे गंभीर दुष्परिणाम रोखण्यासाठी संबंधित गुटखा कंपनीच्या मालकांवर आणि या अवैध व्यवसायातील सूत्रधारांवरच ‘मोका’ कायद्यान्वये कारवाई करण्याबाबत गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली होती.
परराज्यातून अवैध मार्गाने राज्यात मोठ्या प्रमाणात गुटखा आणि सुगंधी सुपारी आणली जाते. यावर 'एफडीए'च्या जप्ती आणि फौजदारी कारवाईनंतरही विक्री होत असल्याने या गुन्हेगारी साखळीला रोखण्यासाठी 'महाराष्ट्र संघटित गुन्हे प्रतिबंधक कायदा' (मकोका) अंतर्गत कारवाईचा निर्णय घेण्याची प्रक्रिया अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पातळीवर सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी मकोका कारवाईची घोषणा करून विभागाच्या प्रस्तावाचे समर्थन केले आहे. याबद्दल अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले.
advertisement
गुटखा, पानमसाला, सुगंधीत तंबाखू व सुपारी, खर्रा, मावा यासारख्या प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन व विक्री करणाऱ्यांवर मकोका कारवाई करण्यासंदर्भात नरहरी झिरवाळ यांनी तीन बैठका घेतल्या होत्या.
view commentsLocation :
Nagpur,Maharashtra
First Published :
December 10, 2025 9:01 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
गुटखा वाहतूक आणि विक्री कराल तर थेट मकोका, देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा










