Devendra Fadnavis : अखेर महाराष्ट्राच्या कुशीत येणार 'ती' 14 गावं! CM फडणवीसांनी दिला निर्णायक आदेश
- Published by:Shrikant Bhosale
- Reported by:Tushar Rupnavar
Last Updated:
प्रलंबित असलेला महाराष्ट्र व तेलंगणा सीमाभागातील गावांचा प्रश्न अखेर मार्गी लागण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.
मुंबई: दीर्घकाळापासून प्रलंबित असलेला महाराष्ट्र व तेलंगणा सीमाभागातील गावांचा प्रश्न अखेर मार्गी लागण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेलंगणा सीमेलगत असलेली 14 गावे महाराष्ट्रात समाविष्ट करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. गेल्या अनेक वर्षापासून हा प्रश्न रखडल्याने नागरिक चिंतेत होते.
या 14 गावांचा चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा व जिवती तालुक्यात समावेश करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर विधानभवनातील महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवराज भोंगळे, जिवती तालुक्यातील 14 गावांचे प्रतिनिधी ग्रामस्थ, तसेच चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांची उपस्थिती होती.
advertisement
गावकऱ्यांनी आपल्या समस्या व मागण्या मंत्र्यांसमोर स्पष्टपणे मांडल्या. त्यावर तत्काळ प्रतिसाद देत महसूलमंत्री बावनकुळे यांनी प्रशासनाला त्वरेने आवश्यक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे सीमाभागातील गावांना शासकीय योजनांचा लाभ, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, रस्ते व पाणीपुरवठा यांसारख्या सेवा मिळवण्यासाठी दरवाजे खुले होणार आहेत. अनेक वर्षांपासून या गावातील रहिवासी महाराष्ट्रात समावेश होण्याची मागणी करत होते.
advertisement
मुख्यमंत्र्यांच्या निर्देशांनंतर आता लवकरच या गावांच्या महाराष्ट्रात अधिकृत समावेशासाठी अधिसूचना जारी होण्याची शक्यता आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे सीमाभागातील नागरिकांना न्याय मिळणार असून त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे.
ही प्रक्रिया पूर्णत्वास गेल्यानंतर, या गावांचा महाराष्ट्रात समावेश अधिकृतपणे मान्य केला जाईल आणि त्यांना सर्व शासकीय सुविधा नियमित स्वरूपात मिळू लागतील. ही कृती केवळ प्रशासकीय निर्णय नसून, सीमाभागातील जनतेच्या आशा-आकांक्षांना दिलेले उत्तर आहे. राज्य शासनाचा हा निर्णय लोकाभिमुख प्रशासनाचे प्रतिक ठरत असून, सीमावर्ती भागातही विकासाचा प्रकाश पोहोचवणारा ठरणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 16, 2025 9:39 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Devendra Fadnavis : अखेर महाराष्ट्राच्या कुशीत येणार 'ती' 14 गावं! CM फडणवीसांनी दिला निर्णायक आदेश