मराठा आरक्षणानंतर नवं मिशन, मनोज जरांगेंचं सीमोल्लंघन, सरकारकडे ९ मागण्या, दिवाळीचं अल्टिमेटम
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाचा लढा अत्यंत आक्रमतेने लढलेले मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यात पडलेल्या ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आपला मोर्चा शेतकरी प्रश्नांकडे वळवला आहे.
बीड : मनोज जरांगे यांनी नारायण गडावर आयोजित केलेल्या दसरा मेळाव्याला हजारो मराठा बांधवांनी हजेरी लावली. आपल्या भाषणात जरांगे यांनी मराठा समाजाला अनेक महत्त्वाचे संदेश दिले. मी थोड्या दिवसांचा पाहुणा आहे. मी आहे तोवर समाजाला आरक्षण मिळालेलं पाहायचंय, अशी भावनिक साद जरांगेंनी घातली. मराठा समाजाने शासक आणि प्रशासक व्हायला हवे. प्रशासनात जा, असे आवाहन जरांगे यांनी मराठा समाजाच्या तरुणांना केले. तसेच यावेळी मराठा आरक्षणाच्या लढ्यादरम्यान फितूर झालेल्या लोकांनाही चांगलेच फटकारले. त्याचवेळी शेतकऱ्यांसाठीही लढा पुकारत असल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.
मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे ९ मागण्या केल्या. दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांना नुकसानाची भरपाई द्यावी अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ देणार नाही, असा इशाराच जरांगे पाटील यांनी दिला. मराठा समाज बांधवांनी आरक्षणाच्या लढ्यात जरांगे पाटलांना साथ दिली होती. आता कर्जमाफी आणि हमीभावाच्या मुद्यावर शेतकरी जरांगे पाटलांना साथ देतील का? हे आगामी काळात स्पष्ट होईल.
advertisement
जरांगे पाटील यांनी सरकारकडे केलेल्या ९ मागण्या
१) मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा
२) पूरग्रस्तांना हेक्टरी 70 हजारांची मदत द्या
३) शेती वाहून गेलेल्यांना 1 लाख 30 हजार मदत द्या
४) शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करा
५) आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील व्यक्तीला सरकारी नोकरी द्या
६) शेतकऱ्याच्या पिकाला हमीभाव द्या
७) शेतीला नोकरीचा दर्जा द्या
advertisement
८) पीकविम्याचे ट्रिगर काढा, संपूर्ण विमा द्या
९) शेतीत काम करणाऱ्याला 10 हजार महिना द्या
जरांगे पाटील यांच्या भाषणातले प्रमुख मुद्दे
-2 वर्ष संपूर्ण मराठा आरक्षणात घातल्याचं वक्तव्य मनोज जरांगेंनी केलंय. एका वर्षात हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट मिळवलंय. मुंबईत जीआर घेऊन मराठा आरक्षणाची लढाई जिंकल्याचं जरांगे म्हणालेत. तर आपल्यांनी फितूर व्हायला नको होतं असही ते म्हणालेत.
advertisement
-आता आपल्याला प्रशासनात लोक टाकायचे आहेत. तरुण-तरुणींना जास्तीत जास्त अधिकारी करण्याचं आवाहन जरांगेंनी मराठा समाजाला केलंय. तर बोगस आरक्षण घेतलेली लोक प्रशासनात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.
-एकसारखं आडनाव सापडलं तर कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचं आवाहन जरांगेंनी केलंय. प्रतिज्ञा पत्र घेऊन तहसीलदारांकडे जाण्याचं आवाहन त्यांनी केलंय. तर पुढील एका महिण्यात पुढची भूमिका जाहीर करणार असल्याचही त्यांनी म्हटलंय.
advertisement
-शेतकऱ्यांचे 15 रुपये का कापता?, सरकारला रोग आलाय का, फडणवीस, शिंदे, पवार, ठाकरे आणि राणेंचे पैसे कापून शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी त्यांनी केली.
-शेतीला नोकरीचा दर्जा देण्याची मागणी मनोज जरांगेंनी केलीय. तर 10 एकरच्या आत शेती करणाऱ्याला 10 हजार रुपये महिना सुरू करण्याची मागणी जरांगे यांनी केली.
Location :
Bid (Beed),Bid,Maharashtra
First Published :
October 02, 2025 6:29 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मराठा आरक्षणानंतर नवं मिशन, मनोज जरांगेंचं सीमोल्लंघन, सरकारकडे ९ मागण्या, दिवाळीचं अल्टिमेटम