Nursery Management: शिस्तबद्ध नियोजन आणि रोपांप्रती प्रेम, बीडच्या व्यावसायिकाने सांगितला नर्सरी व्यवस्थापनाचा फॉर्म्युला
- Reported by:Prashant Pawar
- Published by:Vrushali Kedar
Last Updated:
Nursery Management: दीपक सोनवणे यांनी नर्सरी व्यवसायातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
बीड: आपल्यापैकी अनेकांना बागकामाची आवड असते. पण, योग्य मार्गदर्शनाअभावी आपल्याला आवड व्यवस्थित जोपासता येत नाही. बीड जिल्ह्यातील नित्रुड या गावातील दीपक सोनवणे, हे अशाच लोकांना मार्गदर्शन करण्याचं काम करत आहेत. त्यांनी नर्सरी व्यवसायातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. फळझाडे, शोभेची झाडे व औषधी वनस्पतींची रोपं तयार करून त्यांची ते विक्री करतात. विशेष म्हणजे फक्त बागकामाची आवड असलेलेच नाही तर अनेक शेतकरी देखील त्यांचा सल्ला व मार्गदर्शन घेतात. रोपांची काळजी घेण्यासाठी दीपक सोनवणे यांनी दिलेली माहिती आज अनेकांसाठी मार्गदर्शक ठरत आहे.
सोनवणे सांगतात की, रोपांच्या वाढीसाठी पाणी व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचं आहे. उन्हाळ्यात रोपांना सकाळ-संध्याकाळ पाणी दिल्यास रोपांची वाढ उत्तम होते. याउलट पावसाळ्यात रोपांमध्ये जास्त पाणी साचू नये, याची काळजी घ्यावी लागते. पाणी जास्त झाल्यास रोपांची आणि झाडांची मुळं सडतात आणि झाडाची वाढ देखील खुंटते. त्यामुळे शेती असो किंवा बाग ड्रेनेजची व्यवस्था नेहमी योग्य असली पाहिजे.
advertisement
रोपांची निरोगी वाढ व्हावी यासाठी मातीचं मिश्रण व खतांचा योग्य प्रमाणात वापर केला पाहिजे. लाल माती, वाळू व शेणखत या तिन्हींचे संतुलित मिश्रण झाडांसाठी उत्तम ठरते. तसेच सेंद्रिय खतांचा वापर केल्यास रोपांची वाढ चांगली होते आणि त्यांचा दर्जाही सुधारतो. रोपांना वेळोवेळी आवश्यक खतं दिल्यास त्यांची वाढ अधिक जोमाने होते.
advertisement
किड व रोग नियंत्रणासाठी जैविक कीटकनाशकांचा वापर करण्याचा सल्ला सोनवणे यांनी दिला आहे. सोनवणे म्हणाले, "जैविक कीटकनाशकांचा वापर केल्यास रोपांचं नुकसान न होता कीड नाहीशी होते. काही झाडांना नियमित छाटणीची आवश्यकता असते. छाटणीमुळे रोपाचा आकार व वाढ नियंत्रित राहतो आणि ग्राहकांना दर्जेदार रोपं मिळतात."
रोपांसाठी सूर्यप्रकाश व सावली यांचा समतोल राखणंही फार गरजेचं आहे. फळझाडांना भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक असतो तर शोभेची व औषधी झाडे मध्यम सावलीत चांगली वाढतात. दीपक सोनवणे म्हणाले, "नर्सरी व्यवसाय हा फक्त रोपे विकण्यापुरता मर्यादित नाही. या व्यवसायात शिस्तबद्ध देखभाल, योग्य ज्ञान आणि रोपांप्रती प्रेम आवश्यक आहे. तेव्हाच यश मिळते."
Location :
Bid,Maharashtra
First Published :
Sep 02, 2025 4:08 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nursery Management: शिस्तबद्ध नियोजन आणि रोपांप्रती प्रेम, बीडच्या व्यावसायिकाने सांगितला नर्सरी व्यवस्थापनाचा फॉर्म्युला







