Dharashiv News: तुळजापूरमध्ये संतोष देशमुख प्रकरण घडवायचं होतं का? ओमराज निंबाळकरांचा संतप्त सवाल
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Dharashiv news: . “मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसारखीच पुनरावृत्ती तुळजापुरात घडवण्याचा प्रयत्न तर केला जात नाही ना?” असा थेट संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
धाराशिव: तुळजापुरातील अलीकडील गोळीबार आणि मारहाणीच्या घटनेवरून राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणात धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. “मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसारखीच पुनरावृत्ती तुळजापुरात घडवण्याचा प्रयत्न तर केला जात नाही ना?” असा थेट संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
खासदार निंबाळकर यांनी काल घडलेल्या घटनेला उघड गुंडगिरी ठरवत, या गुंडगिरीला भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांचेच पाठबळ असल्याचा आरोप केला. “एखाद्याच्या घरासमोर दिवसा ढवळ्या फायरिंग होते, हातात कोयते आणि तलवारी घेऊन लोक फिरतात, मारहाण केली जाते. यामुळे तुळजापुरची बदनामी होत आहे. ही बदनामी आमदार राणा पाटलांना दिसत नाही का?” असा सवाल त्यांनी केला.
advertisement
कुलदीप मगर यांनी तुळजापूर प्रकरणात पोलीस तक्रार दाखल केली आहे. त्याचा आधार घेत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले की, या घटनेतून संतोष देशमुख हत्या प्रकरणासारखीच प्रवृत्ती पुन्हा डोके वर काढताना दिसते. याच वेळी ड्रग्स प्रकरणात विरोधक आणि पत्रकार तुळजापुरची बदनामी करत असल्याचे सांगत आमदार राणाजगजित सिंह लक्षवेधी सूचना मांडतात. मात्र त्या लक्षवेधी प्रत्यक्षात पोलिसांवर आणि राज्याचे गृहखाते सांभाळणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खात्यावरच अविश्वास दाखवणाऱ्या ठरतात, असा टोला त्यांनी लगावला.
advertisement
“जर पोलिसांवर विश्वास नसेल, तर मग दिवसा ढवळ्या गोळीबार, कोयत्यांनी दहशत आणि मारहाण याला कोण जबाबदार?” असा प्रश्न उपस्थित करत निंबाळकर यांनी तुळजापुरातील गुंडगिरीला आश्रय देणाऱ्या घटकांवर कठोर कारवाईची मागणी केली. या गुंडगिरीला आणि अशा प्रवृत्तींना भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांचे पाठबळ असल्याचा आरोप त्यांनी पुन्हा एकदा केला.
अन्यथा नियती बघून घेईल...
advertisement
ओमराजे निंबाळकर यांनी जोरदार टीकस्त्र सोडताना म्हटले की, “जनाची नाही तरी मनाची तरी बाळगा; अन्यथा नियती बघून घेईल,” अशा शब्दांत त्यांनी इशारा देत तुळजापुरातील घडामोडींना आमदार राणा पाटील यांना जबाबदार धरले. तसेच, या संपूर्ण प्रकरणातील पोलीस तपासावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, निष्पक्ष आणि कडक कारवाईची मागणी केली आहे.
view commentsLocation :
Tuljapur,Osmanabad,Maharashtra
First Published :
Dec 19, 2025 2:05 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Dharashiv News: तुळजापूरमध्ये संतोष देशमुख प्रकरण घडवायचं होतं का? ओमराज निंबाळकरांचा संतप्त सवाल









