अमित शाहांसोबतच्या बैठकीआधी उदय सामंत यांचं CM पदावर वक्तव्य, भाजपच्या पोटात गोळा
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Uday Samant on Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडल्याचे अनेकांनी म्हटले. परंतु भूमिका स्पष्ट करणे म्हणजे त्यांनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला असे नाही, असे शिवसेना नेते उदय सामंत निक्षून सांगितले आहे.
मुंबई : लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ अशी आपली ओळख झालेली असून कोणत्याही पदापेक्षा ते पद सर्वश्रेष्ठ असल्याचे सांगत अडीच वर्षात केलेली कामे आणि कल्याणकारी योजनांमुळेच जनतेची पुन्हा साथ लाभल्याचे अधोरेखित करून आता मुख्यमंत्रिपदासंदर्भात पुढील निर्णय घेण्याचे सर्वाधिकार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना आहेत, असे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यांच्या भूमिकेनंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडल्याचे अनेकांनी म्हटले. परंतु एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडलेला नाही, असे शिवसेना नेते उदय सामंत निक्षून सांगितले आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी लागला, मात्र मुख्यमंत्री कोण होणार याचा सस्पेन्स बुधवारपर्यंत संपत नव्हता. एकनाथ शिंदे यांनी अखेर ठाण्यातील निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्रिपदाची कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. मी मोकळ्या मनाचा माणूस आहे. ताणून ठेवणार नाही. सत्तास्थापनेचे घोडे कुठेही अडलेले नाही. मोदी-शाह यांना फोन करून मुख्यमंत्रिपदाचा अंतिम निर्णय घेण्याबाबत कळविले असल्याचे शिंदे यांनी बुधवारी सांगितले. त्यानंतर मुख्यमंत्रिपदाचे गूढ संपलेले असून भाजपचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले गेले. परंतु माजी मंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेत पुन्हा एकदा सस्पेन्स आणला.
advertisement
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडलेला नाही
उदय सामंत म्हणाले, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यातील निवासस्थानची पत्रकार परिषद म्हणजे त्यांनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला, असा अर्थ होत नाही. एकनाथ शिंदे यांनी केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा अंतिम निर्णय सोपवला आहे. मोदी-शाह घेतील तो निर्णय मान्य असेल, असे शिंदे म्हणाल्याचे उदय सामंत यांनी अधोरेखित केले.
advertisement
उदय सामंतांच्या वक्तव्याने भाजपच्या पोटात गोळा
गुरुवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीच्या नेत्यांची बैठक होत आहे. या बैठकीत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार आणि सत्तावाटपाचे समीकरण काय असणार, यावर प्रामुख्याने चर्चा होणार आहे. त्याआधीची उदय सामंत यांनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडलेला नाही, असे सांगत भाजपच्या पोटात गोळा आणला आहे.
advertisement
एकनाथ शिंदे रवाना, फडणवीस-अजित पवार दिल्लीला पोहोचले
अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीसाठी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साडे सहा वाजताच्या दरम्यान मुंबईवरून दिल्लीला रवाना झाले. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दुपारीच दिल्लीत पोहोचले. अजित पवार यांच्यासोबत प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे बैठकीला असणार आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत उदय सामंत बैठकीत सहभागी होतील.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 28, 2024 7:17 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अमित शाहांसोबतच्या बैठकीआधी उदय सामंत यांचं CM पदावर वक्तव्य, भाजपच्या पोटात गोळा


