मुंबईची तिजोरी लुटणारे 'रेहमान डकैत'; धुरंधरमधले डायलॉग वापरत शिंदेची जोरदार फटकेबाजी; अधिवेशन गाजवलं
- Published by:Prachi Amale
Last Updated:
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फिल्मी डायलॉगबाजी केल्यानं सभागृहात धुरंधरचाच बोलबाला पाहायला मिळाला.
नागपूर : सध्या देशात धुरंधर सिनेमानं एकच धुमाकूळ घातलाय. यातील रहमान डकैत ही व्यक्तिरेखा चांगलीच चर्चेत आहे. आज विधानपरिषदेत झालेल्या अंतिम आठवडा प्रस्तावात अनपेक्षितपणे रहमान डकैतचा उल्लेख झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फिल्मी डायलॉगबाजी केल्यानं सभागृहात धुरंधरचाच बोलबाला पाहायला मिळाला.
सध्या जिकडे पाहावं तिकडे धुरंधर सिनेमाचाच बोलबाला आहे. सोशल मीडिया, रिल्स, मीम्स सगळीकडे फक्त धुरंधरचाच जलवा आहे. तिकडे नागपुरात राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे.राज्याच्या राजकारणातले अनेक धुरंधर तिथे बंदुकीच्या नाही पण जिभेच्या फैरी चालवताना दिसत आहेत.
मुंबईला लुटणारे रहमान डकैत कोण?
एकमेकांवर टीका टिप्पणी टोल प्रतिटोल्यांची बरसात करताना कोणीही मागे हटत नाहीये. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना जोरदार डायलॉगबाजी केली. उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता शिंदे यांनी मुंबईला लुटणारे रहमान डकैत कोण असा थेट सवाल केला. केवळ एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर असल्या रहमान डकैतना पाणी पाजणारी आमची धुरंधर महायुती आहे असा जोरदार टोलाही त्यांनी लगावला.
advertisement
उद्धव ठाकरे यांना लगावला जबरी टोला
आपल्या भाषणात शिंदेंनी अनेक विषयांवर भाष्य केलं असलं तरी त्यांचं मुख्य टार्गेट अर्थातच उद्धव ठाकरे होते. शिंदेंनी जोरदार शेरोशायरी करत नाव न घेता उद्धव ठाकरे यांना जबरी टोले लगावले. अधिवेशन काळात आपल्यावर झालेल्या प्रत्येक टीकेचा शिंदेंनी खरपूस शब्दात समाचार घेतला. आम्ही रात्री 2 वाजेपर्यंत सभागृह चालवलं तर काही 2 तास सभागृहात बसले, घरात नाही दाणा पण भले पाटील म्हणा, विरोधक फक्त विरोधी पक्षनेते पदाबाबत बोलायचे, अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ अशी काहींची स्थिती आहे, अशा शब्दात शिंदेंनी सुनावले आहे. एकूणच शिंदेंनी केलेल्या या धुरंधर टीकेची पुढचे काही दिवस धुवाँधार चर्चा होणार हे नक्की आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 14, 2025 7:56 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मुंबईची तिजोरी लुटणारे 'रेहमान डकैत'; धुरंधरमधले डायलॉग वापरत शिंदेची जोरदार फटकेबाजी; अधिवेशन गाजवलं










