अनुदानाबाबत जाब विचारणाऱ्या शेतकऱ्याला बुटाने मारहाण, वाशीमच्या कृषी अधिकाऱ्याचा प्रताप
- Reported by:Kishor Gomashe
- Published by:Prachi Amale
Last Updated:
अनुदानाबाबत जाब विचारणाऱ्या शेतकऱ्याला थेट तालुका कृषी अधिकाऱ्याने बुटाने आणि मातीच्या ढेकळाने मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
वाशीम : मंगरुळपीर तालुक्यातील गोगरी परिसरात मनरेगा अंतर्गत संत्रा फळबागेचे अनुदान रखडल्याच्या पार्श्वभूमीवर धक्कादायक प्रकार घडला आहे. अनुदानाबाबत जाब विचारणाऱ्या शेतकऱ्याला थेट तालुका कृषी अधिकाऱ्याने बुटाने आणि मातीच्या ढेकळाने मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे तालुक्यातील शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गोगरी येथील शेतकरी ऋषिकेश पवार यांनी सुमारे दोन वर्षांपूर्वी मनरेगा योजनेंतर्गत तीन एकर क्षेत्रावर संत्रा फळबाग लावली होती. या फळबागेसाठी शासनाकडून मिळणारे अनुदान मागील चार महिन्यांपासून रखडले आहे. संबंधित फळबागेचे हजेरी पत्रक वेळेत न काढल्यामुळे अनुदान अडकल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या संदर्भात ऋषिकेश पवार यांच्यासह इतर काही शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयाकडे वारंवार पाठपुरावा करत अनुदान त्वरित मिळावे, अशी मागणी केली होती.
advertisement
शेतात नेमकं काय घडलं?
दरम्यान, मंगरुळपीरचे तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे हे गोगरी शिवारात पाहणीसाठी गेले असता हा वाद उफाळून आला. पाहणीदरम्यान ऋषिकेश पवार यांनी कृषी अधिकारी व कृषी पर्यवेक्षक यांच्याकडे मनरेगा अंतर्गत प्रलंबित अनुदानाबाबत जाब विचारला. मात्र या मागणीवर संतप्त झालेल्या तालुका कृषी अधिकाऱ्याने थेट शेतकऱ्याच्या अंगावर धावून जात पायातील बुटाने मारहाण केल्याचा आरोप आहे. एवढ्यावरच न थांबता शेतात पडलेल्या मातीच्या ढेकळानेही मारहाण करण्यात आल्याचे सांगितले जाते.
advertisement
स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र निषेध
या प्रकारानंतर संबंधित अधिकाऱ्याने शेतकऱ्याला तुला गुन्ह्यात अडकवीन अशी धमकी दिल्याचाही आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. घटनेनंतर अधिकारी तेथून निघून गेले. या घटनेची माहिती परिसरात पसरताच शेतकरी संघटनांनी आणि स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
प्रशासनाच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष
मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांचे अनुदान अद्याप प्रलंबित असून संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, तसेच रखडलेले अनुदान त्वरित वितरित करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे. या प्रकरणामुळे प्रशासनाच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 13, 2026 3:14 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अनुदानाबाबत जाब विचारणाऱ्या शेतकऱ्याला बुटाने मारहाण, वाशीमच्या कृषी अधिकाऱ्याचा प्रताप










