करमाळ्यात बापाचं हैवानी कृत्य; जुळ्या मुलांना विहिरीत ढकललं, नंतर असं काही केलं की...
- Published by:Prachi Amale
Last Updated:
सुहास प्रचंड मानसिक तणावात होता. याच रागाच्या भरात त्याने अत्यंत टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती आहे.
सोलापूर : करमाळा तालुक्यातील हिंगणी परिसरात घडलेल्या एका अत्यंत हृदयद्रावक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. किरकोळ वादातून संतापाच्या भरात वडिलाने आपल्या दोन चिमुकल्या मुलांचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
सुहास ज्ञानदेव जाधव (वय 32), असे आरोपीचे नाव असून तो वीज वितरण कंपनीत कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुहास आणि त्याच्या कुटुंबीयांमध्ये घरात काहीतरी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादामुळे सुहास प्रचंड मानसिक तणावात होता. याच रागाच्या भरात त्याने अत्यंत टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती आहे.
शेतात फिरायला नेलं अन्...
advertisement
नेहमीप्रमाणे मुलांना फिरायला नेत असल्याचा बहाणा करून सुहासने आपली दोन मुले शिवांश आणि श्रेया यांना करमाळा तालुक्यातील हिंगणी येथील स्वतःच्या शेतात नेले. शेतातील विहिरीजवळ नेऊन काही कळण्याच्या आतच त्याने दोन्ही निष्पाप मुलांना विहिरीत ढकलून दिले. या अमानुष कृत्यात दोन्ही मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
विहिरीतून दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढून पंचनामा
advertisement
मुलांच्या मृत्यूनंतर आरोपी सुहास जाधव यानेही स्वतःचे आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. त्याने शेतातच विषारी औषध प्राशन केले. काही वेळातच त्याची प्रकृती खालावली. दरम्यान, या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांना मिळताच एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती करमाळा पोलिसांना देण्यात आली. करमाळा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी विहिरीतून दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला.
advertisement
संपूर्ण परिसरात शोककळा
विष प्राशन केल्याने गंभीर अवस्थेत असलेल्या सुहास जाधवला ताब्यात घेण्यात आले असून तातडीने सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) उपचारासाठी हलवण्यात आले आहे. सध्या त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, दोन चिमुकल्यांच्या अकाली मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे. करमाळा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
view commentsLocation :
Solapur,Maharashtra
First Published :
Jan 11, 2026 3:43 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
करमाळ्यात बापाचं हैवानी कृत्य; जुळ्या मुलांना विहिरीत ढकललं, नंतर असं काही केलं की...









