चार मते कशी द्यायची? गोंधळून जाऊ नका, मतदान कसं करायचं ते समजून घ्या, क्रम चुकला तर मत बाद
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Municipal Corporation Elections: राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये यंदा मतदानाची प्रक्रिया पूर्णपणे बदलण्यात आली आहे. मतदारांना एका नव्हे तर चार स्वतंत्र मतांचा वापर करावा लागणार असल्याने ही निवडणूक ऐतिहासिक ठरणार आहे.
कोल्हापूर : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा प्रचार आता निर्णायक टप्प्यात आला असून, यंदाची ही निवडणूक अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरण्याची चिन्हे आहेत. बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे ही निवडणूक जितकी पक्षांसाठी महत्त्वाची आहे, तितकीच ती मतदारांसाठीही वेगळी आणि लक्षवेधी ठरणार आहे. कारण यंदा महानगरपालिका निवडणुकीत मतदानाची संपूर्ण प्रक्रिया बदलण्यात आली आहे.
advertisement
यंदाच्या निवडणुकीत मतदारांना फक्त एक मत न देता, चार स्वतंत्र मते देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी मतदान यंत्रामध्ये चार वेगवेगळ्या रंगांच्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा (EVM) वापर केला जाणार असून, प्रत्येक यंत्रावर मतदान केल्यानंतरच मतदाराचे मतदान पूर्ण झाल्याचे मानले जाणार आहे.
advertisement
निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार महानगरपालिका निवडणुकीत प्रभागनिहाय चार सदस्यीय प्रणाली लागू करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराला चार वेगवेगळ्या उमेदवारांना मतदान करण्याचा अधिकार मिळणार आहे. कोल्हापूर शहरातील प्रभाग क्रमांक 20 मध्ये पाच सदस्यीय रचना असल्याने तेथील मतदारांना पाच मते देण्याची संधी असणार आहे.
advertisement
मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या EVM मशिनवर प्रत्येक मतासाठी स्वतंत्र बटण असेल. उमेदवारांना अ, ब, क, ड (आणि प्रभाग 20 साठी अ, ब, क, ड, इ) अशा क्रमाने दर्शवण्यात येणार आहे. प्रत्येक मत नोंदविल्यानंतर यंत्रामधून बीप असा आवाज येईल. तो आवाज ऐकल्यानंतरच पुढील मत नोंदवता येईल.
advertisement
मतपत्रिकांसाठी वेगवेगळे रंग निश्चित करण्यात आले आहेत. ते पुढील प्रमाणे:
अ साठी पांढरा,
ब साठी फिकट गुलाबी,
क साठी फिकट पिवळा,
ड साठी फिकट हिरवा
(आणि प्रभाग 20 साठी पाचवा वेगळा रंग) वापरण्यात येणार आहे.
advertisement
निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, एका जागेसाठी एकाच उमेदवाराला एकच मत देता येईल. अ, ब, क, ड या चारही गटांमध्ये चार वेगवेगळ्या उमेदवारांना मतदान करणे आवश्यक आहे. एखाद्या उमेदवाराला दोन वेळा मत दिल्यास ते मत ग्राह्य धरले जाणार नाही.
advertisement
मतदानाची प्रक्रिया पुढीलप्रमाणे असेल
मतदान केंद्रात प्रवेश केल्यानंतर अधिकाऱ्यांकडून मतदाराची ओळख तपासली जाईल.
त्यानंतर मतदाराला चार वेगवेगळ्या रंगांच्या EVM बटणांची माहिती दिली जाईल.
प्रत्येक मत नोंदवताना स्वतंत्रपणे बटण दाबावे लागेल.
सर्व बटणे एकाच वेळी दाबता येणार नाहीत. चारही (किंवा पाच) मते नोंदवल्यानंतरच मतदान पूर्ण होईल.
मतदारांनी मतदान करताना कोणतीही घाई करू नये, प्रत्येक मत नोंदविल्यानंतर बीप आवाज आला आहे की नाही याची खात्री करावी, तसेच मतदान पूर्ण होईपर्यंत मतदान केंद्र सोडू नये, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
महत्त्वाचे म्हणजे, बटण दाबण्याचा क्रम पाळणे आवश्यक आहे. मतदाराला एकाच उमेदवाराला किंवा एकाच गटाला चारही मते देता येणार नाहीत, तर चार वेगवेगळ्या जागांसाठी चार वेगवेगळ्या मते द्यावी लागतील.
प्रत्येक गटासाठी ‘नोटा’ (None of the Above) चा स्वतंत्र पर्याय उपलब्ध असणार आहे. एखाद्या गटातील कोणताही उमेदवार पसंत नसेल, तरी त्या गटासाठी नोटाचा पर्याय निवडणे बंधनकारक असेल.
मतदानासाठी केवळ मतदार स्लिप पुरेशी नसून, आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा निवडणूक आयोगाने मान्य केलेले कोणतेही अधिकृत ओळखपत्र सोबत असणे आवश्यक आहे.
महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदानाची वेळ सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.
एकूणच, यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत मतदारांना चार (प्रभाग २० मध्ये पाच) स्वतंत्र मते द्यावी लागणार असून, योग्य क्रमाने, समजून आणि शांतपणे मतदान करणे अत्यंत आवश्यक आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 11, 2026 3:43 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
चार मते कशी द्यायची? गोंधळून जाऊ नका, मतदान कसं करायचं ते समजून घ्या, क्रम चुकला तर मत बाद











