Ring Railway: दसरा-दिवाळीत गावी जाणाऱ्यांचे हाल! रिंग रेल्वेच्या 4 फेऱ्या अचानक रद्द, कारण काय?
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Ring Railway: रिंग रेल्वे 27 सप्टेंबर, 4 ऑक्टोबर, 11 ऑक्टोबर आणि 18 ऑक्टोबर रोजी धावणार होती.
मुंबई: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमची) सारख्या मोठ्या स्टेशनवर प्रचंड गर्दी होते. मुंबईतील रेल्वे टर्मिनसवरील हीच गर्दी विभागण्यासाठी भारतीय रेल्वेने रिंग रेल्वेचा प्रयोग सुरू केला आहे. मात्र, या प्रयोगात विघ्न आल्याचं दिसत आहे. उत्तर पूर्व रेल्वेचे (एनईआर) उपमुख्य परिचालन व्यवस्थापक (कोचिंग) पी. के. अस्थाना यांनी याबाबत एक परिपत्रक प्रसिद्ध केलं आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांचे हाल झाले असून त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, विशेष गाडी क्रमांक 05017 गोमती नगर-पुणे-पनवेल- गोमती नगर ही रिंग रेल्वे उत्तर पूर्व रेल्वेने (एनईआर) रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) मधील तांत्रिक अडचणीमुळे रिंग रेल्वेच्या चार फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. गाडी सुटण्याच्या आदल्या दिवशी हा निर्णय जाहीर करण्यात आला.
advertisement
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर भारतातून मुंबईत येणाऱ्या विशेष रेल्वेगाड्यांना रिटर्न ब्रेक पॉवर सर्टिफिकेटने प्रमाणित केलेलं असतं. याचा अर्थ या गाड्या तीन हजारांहून अधिक किलोमीटरपर्यंत तात्पुरत्या देखभालीसह धावण्यासाठी सक्षम असतात. यामुळे विशेष गाड्या शहरातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस येथे न आणता कल्याण, पनवेल आणि कर्जत रेल्वे स्थानकांत आणून त्याच स्थानकातून पुढील प्रवासासाठी मार्गस्थ करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता.
advertisement
गोमती नगर-पुणे-पनवेल-गोमती नगर ही रिंग रेल्वे 27 सप्टेंबर, 4 ऑक्टोबर, 11 ऑक्टोबर आणि 18 ऑक्टोबर रोजी धावणार होती. प्रवासी आरक्षण प्रणालीमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने रिंग रेल्वेच्या चार फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. उत्तर पूर्व रेल्वेने रिंग रेल्वेचा निर्णय घेताना मध्य रेल्वेसह अन्य क्षेत्रीय रेल्वेला विचारणा केली नव्हती. त्यामुळे ही रिंग रेल्वे रद्द करण्यात आली, असंही म्हटलं जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 27, 2025 9:21 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ring Railway: दसरा-दिवाळीत गावी जाणाऱ्यांचे हाल! रिंग रेल्वेच्या 4 फेऱ्या अचानक रद्द, कारण काय?