शिवसेना आमदारावर गिरीश महाजन संतापले, शिंदेंना म्हणाले, त्यांना जरा नीट समज द्या...
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
शिवसेना आमदार सुहास बाबर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल एकेरी भाषेत टीका केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन चांगलेच चिडले.
मुंबई : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षच स्थानिक पातळीवर एकमेकांच्या विरोधात लढत असल्याने आरोप प्रत्यारोपांना अधिकच धार चढली आहे. शिवसेना आमदार सुहास बाबर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल एकेरी भाषेत टीका केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन चांगलेच चिडले. सुहास बाबर यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करणं चुकीचं आहे. त्यांच्या भाषेवरून एकनाथ शिंदे यांनी त्यांना समज द्यावी, असे गिरीश महाजन म्हणाले.
माझ्यासारखे २४२ आमदार आहेत म्हणून तुझा मुख्यमंत्री आहे. मुख्यमंत्र्यांना विचार, सुहास बाबर कोण आहेत? खानापूर-आटपाडीची भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना मीच चालवतो. मी दिसतो शांत पण कार्यक्रम करायला लागलो तर बघ... असे आक्रमक भाषण सुहास बाबर यांनी केले. त्यांच्या याच भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजपने संताप व्यक्त केला.
एकनाथ शिंदे यांनी सुहास बाबर यांना समज द्यावी
advertisement
आमदार सुहास बाबर यांचे भाषण मी विविध वृत्तवाहिन्यांवर पाहिले. मला वाटते त्यांची ही पहिलीच टर्म आहे. त्यांची भाषा पाहून मला आश्चर्य वाटले. त्यांच्या भाषेबद्दल एकनाथ शिंदे यांनी त्यांना समज द्यावी, असे गिरीश महाजन म्हणाले.
तसेच सुहास बाबर यांचे वडील अनिल बाबर हे माझे अतिशय चांगले मित्र होते. त्यांची माझी जवळपास ३० वर्षांची मैत्री होती. अनेक वर्षांपासून आम्ही सदनातही एकत्र होतो. पण त्यांच्या चिरंजीवाच्या भाषणाने दु:ख झाले, असे महाजन म्हणाले.
advertisement
मी त्यांना बोललोच नाही, सुहास बाबर यांचे स्पष्टीकरण
आमदार सुहास बाबर यांनी यावर स्पष्टीकरण देताना मी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला नाही. तर भाजपच्या तालुक्यातील ज्या स्थानिक पदाधिकाऱ्याने माझ्यावर, माझ्या स्वर्गवासी वडिलांवर आरोप केले, त्यांच्या संदर्भाने मी एकेरी भाषेचा उल्लेख केल्याचा खुलासा केला. आम्ही आणि मुख्यमंत्री सोबत आहोत. ज्याने आमच्यावर टीका केली त्याचा मी एकेरी उल्लेख केल्याचे आमदार सुहास बाबर म्हणाले. मी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला, असे विरोधक अपप्रचार करत असल्याचा आरोप बाबर यांनी केला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 04, 2026 8:21 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शिवसेना आमदारावर गिरीश महाजन संतापले, शिंदेंना म्हणाले, त्यांना जरा नीट समज द्या...







