Heart Attack: अचानक खाली कोसळली अन्.., छ. संभाजीनगरच्या जीममध्ये तरुणीचा मृत्यू
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Heart Attack: अलीकडच्या काळात जिममध्ये व्यायाम करताना अचानक मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे.
छत्रपती संभाजीनगर : तरुण वयात रक्तातील साखरेची पातळी वाढणे, वजन वाढणे, रक्तदाब किंवा खराब कोलेस्ट्रॉल वाढणे इत्यादी आरोग्याच्या समस्यांमुळे अनेक तरुण मंडळी जिमकडे वळतात. जिममध्ये जाऊन वजन कमी केल्यामुळे या सर्व समस्या दूर होतील, असा अनेकांचा समज असतो. जिममध्ये गेल्यानंतर अचानक शारीरिक क्रियांमध्ये बदल झाल्याने हृदयावर ताण निर्माण होऊ शकतो. याच कारणांमुळे जिममध्ये व्यायाम करताना अचानक मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात देखील अशीच एक घटना घडली आहे. एका 20 वर्षांच्या तरुणीचा जिममध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रियंका अनिल खरात (वय 20 रा. बीड बायपास) असं, मृत तरुणीचं नाव आहे. प्रियंकाने बी.फार्मसी शिक्षण पूर्ण केलेलं होतं. प्रियंकाचे वडील अनिल खरात हे देवगाव रंगारी येथे पोलीस हवालदार म्हणून नोकरी करतात. महिनाभरापासून प्रियांकाने जिम जॉईन केली होती. गुरुवारी संध्याकाळी जिमला जाऊन येते, असं सांगून ती घरातून बाहेर पडली होती. तिच्यासोबत भाऊ यश आणि मैत्रीण प्रणाली कुलकर्णी हे देखील तिच्या सोबत होते.
advertisement
जिममध्ये गेल्यानंतर नेहमीप्रमाणे प्रियांकाने व्यायाम केला. व्यायाम झाल्यानंतर प्रियंका भावाची वाट बघत उभी होती. वाट बघत असताना प्रियंकाला अचानक चक्कर आली आणि ती खाली कोसळली. यामुळे तिला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचार सुरू असताना प्रियंकाला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि तिचा मृत्यू झाला.
advertisement
प्रियंकाच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आई बाहेर गेली असल्यामुळे प्रियंका वडिलांना चहा देऊन जीमला गेली होती. ही गोष्ट आठवून तिने वडील भावुक होत आहेत. प्रियंकाचे वडील म्हणाले, "जीमला जाण्यापूर्वी तिने करून दिलेला चहा हा तिच्या हातचा शेवटचा चहा ठरला." प्रियंकाच्या भावाला देखील याचा मोठा धक्का बसला आहे. गादिया विहार येथील स्मशानभूमीमध्ये तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
September 13, 2025 12:49 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Heart Attack: अचानक खाली कोसळली अन्.., छ. संभाजीनगरच्या जीममध्ये तरुणीचा मृत्यू