गोंदिया हादरलं! चक्क पोलीस ठाण्याच्या पार्किंगमध्येच रुग्णवाहिका चालकाचा गळफास; तेलंगणातील 'शिवा'ने का संपवलं आयुष्य?
- Published by:Prachi Amale
Last Updated:
पोलीस स्टेशनच्या पार्किंग परिसरात उभ्या असलेल्या एका पिकअप वाहनाच्या मागील बाजूस शिवाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
रवी सपाटे, प्रतिनिधी
गोंदिया: गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील डूग्गीपार पोलीस स्टेशनच्या पार्किंग परिसरात तेलंगणा राज्यातील एका रुग्णवाहिका चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली. शिवा असे या चालकाचे नाव असून तो तेलंगणा राज्यातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवा हा खाजगी रुग्णवाहिकेतून तेलंगणा राज्यातून एक मृतदेह घेऊन नातेवाईकांसह त्यांच्या गावी जात होता. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात आल्यानंतर चालक शिवाने मद्यप्राशन केल्यामुळे मृताच्या नातेवाईकांसोबत त्याचा वाद झाला. हा वाद वाढत गेल्यानंतर संबंधित नातेवाईकांनी डूग्गीपार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी मृतदेह दुसऱ्या रुग्णवाहिकेत टाकून पुढील प्रवासासाठी रवाना केला. तर मूळ रुग्णवाहिका आणि चालक शिवा यांना चौकशीसाठी डूग्गीपार पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले.
advertisement
नेमकं काय झालं?
दरम्यान, आज सकाळी पोलीस स्टेशनच्या पार्किंग परिसरात उभ्या असलेल्या एका पिकअप वाहनाच्या मागील बाजूस दोरीच्या साहाय्याने शिवाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक पथकाला पाचारण करून पंचनामा करण्यात आला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.
advertisement
पोलीस ठाण्याच्या परिसरात मोठी खळबळ
पोलिसांनी वाहन अडविल्यामुळे व झालेल्या कारवाईच्या तणावातून शिवाने आत्महत्या केली की त्यामागे आणखी काही कारणे आहेत, याचा सखोल तपास सुरू आहे. या प्रकरणाचा तपास गोंदिया पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून सर्व बाबींची बारकाईने चौकशी केली जात आहे. या घटनेमुळे पोलीस ठाण्याच्या परिसरात एकच खळबळ उडाली असून, मृताच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. तपासाअंती आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
Location :
Gondiya,Maharashtra
First Published :
Feb 16, 2026 2:53 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
गोंदिया हादरलं! चक्क पोलीस ठाण्याच्या पार्किंगमध्येच रुग्णवाहिका चालकाचा गळफास; तेलंगणातील 'शिवा'ने का संपवलं आयुष्य?










