हडपसर विधानसभा निवडणूक 2024 : हडपसरमध्ये दोन राष्ट्रवादींच्या लढतीत मनसेची फोडणी! तिरंगी लढतीमुळे उत्सुकता वाढली
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
Maharashtra Assembly Election 2024, Hadapsar Assembly constituency : राष्ट्रवादीच्या दोन गटांमधल्या या सामन्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तगडा उमेदवार दिल्याने तिरंगी लढत होणार आहे. साईनाथ बाबर हे मनसे शहराध्यक्ष हडपसरमधून उतरले आहेत.
पुणे : जिल्ह्यात 21 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि ते सहा लोकसभा मतदारसंघात विभागले आहेत. त्यापैकी पूर्व पुण्याच्या लगतचा मतदारसंघ म्हणजे हडपसर. हडपसरमधून विद्यमान आमदार राष्ट्रवादीचे चेतन तुपे आहेत आणि ते अजित पवारांचे समर्थक आहेत. राष्ट्रवादीने यावर्षीच्या निवडणुकीलाही त्यांनाच तिकिट दिलं आहे. महायुतीप्रमाणे महाविकास आघाडीनेही हडपसरची जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटासाठी सोडली आहे. त्यांच्यापक्षाने प्रशांत जगताप या शहराध्यक्षांना तिकिट दिलं आहे. राष्ट्रवादीच्या दोन गटांमधल्या या सामन्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तगडा उमेदवार दिल्याने तिरंगी लढत होणार आहे. साईनाथ बाबर हे मनसे शहराध्यक्ष हडपसरमधून उतरले आहेत.
हडपसर विधानसभा मतदारसंघाचा इतिहास
पूर्व पुण्यातील सोलापूर रोड, हडपसर, कात्रज, कोंढवा, मुंढवा, उरुळी देवाची हे भाग हडपसर मतदारसंघात येतात. 2009 मध्ये हा मतदारसंघ अस्तित्वात आला. त्यानंतर शिवसेनेचे महादेव बाबर आमदार झाले. 2014 च्या निवडणुकीत युती आणि आघाडी नव्हती. चारही पक्ष स्वतंत्रपणे विधानसभा लढले होते. त्यावेळी भाजपचे योगेश टिळेकर हडपसरचे आमदार झाले. 2019 मध्ये शिवसेना-भाजप युती होती आणि काँग्रेस-राष्ट्रवादीदेखील निवडणूकपूर्व आघाडी होती. युतीतर्फे पुन्हा भाजपच्याटिळेकरांनी निवडणूक लढवली तर आघाडीने राष्ट्रवादीच्या चेतन विठ्ठल तुपे यांना तिकिट दिलं. केवळ 2820 मतांच्या फरकाने चेतन तुपे मागची निवडणूक जिंकले. मनसेतर्फे वसंत मोरे रिंगणात होते आणि त्यांनाही लक्षणीय मतं मिळाली. याच मोरे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करून पुणे लोकसभा निवडणूक लढवली होती.
advertisement
2019 विधानसभा निवडणूक निकाल
चेतन तुपे – राष्ट्रवादी -92,326
योगेश टिळेकर – भाजप – 89,506
वसंत मोरे – मनसे - 34,809
2024 लोकसभेत काय झालं?
हडपसर विधानसभा मतदारसंघ शिरूर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. शिरूरमध्ये महाविकास आघाडीकडून डॉ. अमोल कोल्हे विरुद्ध महायुतीचे शिवाजीराव आढळराव पाटील एकमेकांविरोधात होते. यात कोल्हे यांनी बाजी मारली. ते सलग दोन वेळा शिरूरमधून खासदार झाले आहेत. पूर्वीच्या सेनेचे आणि निवडणुकीआधी युतीसाठी पक्ष बदलून राष्ट्रवादीतर्फे निवडणूक लढवणारे शिवाजीराव आढळराव पाटील यांचा शिरूरमध्ये पराभव झाला पण त्यांना केवळ एका विधानसभा क्षेत्रात कोल्हेंपेक्षा अधिक मतं मिळाली.
advertisement
लोकसभा निवडणुकीत कोल्हे यांच्या प्रचारासाठी ठाकरे गटाचे माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, महादेव बाबरआणि शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, योगेश ससाणे यांनी एकत्रित काम केलं होतं. त्या सगळ्या मेहनतीमुळे हडपसरमधून डॉ. अमोल कोल्हे यांना चांगलं मताधिक्य मिळालं. पण बाबर आणि शिवरकर या विधानसभेसाठी इच्छुक होते. त्यांना डावलण्यात आल्याने ते जगताप यांचा प्रचार मनापासून करतील का हा प्रश्न आहे. चेतन तुपे या महायुतीच्या उमेदवाराबाबतही अशीच परिस्थिती आहे. अजित पवार गटाचे काही इच्छुक नाराज असल्याच्या बातम्या आहेत. त्यामुळे तुपे यांच्या मतांवर परिणाम होणार का हे स्पष्ट झालेलं नाही.
advertisement
पुणे जिल्ह्यात कोण कोण आमदार?
जुन्नर - अतुल बेनके (राष्ट्रवादी)
आंबेगाव - दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी)
खेड आळंदी – दिलीप मोहिते (राष्ट्रवादी)
शिरुर - अशोक पवार (राष्ट्रवादी)
दौंड - राहुल कुल (भाजप)
इंदापूर - दत्ता भरणे (राष्ट्रवादी)
बारामती- अजित पवार (राष्ट्रवादी)
पुरंदर - संजय जगताप (काँग्रेस)
भोर - संग्राम थोपटे (काँग्रेस)
advertisement
मावळ - सुनिल शेळके (राष्ट्रवादी)
चिंचवड - लक्ष्मण जगताप - पोटनिवडणुकीनंतर अश्विनी लक्ष्मण जगताप (भाजप)
पिंपरी - अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी)
भोसरी - महेश लांडगे (भाजप)
वडगाव शेरी - सुनिल टिंगरे (राष्ट्रवादी)
शिवाजीनगर - सिद्धार्थ शिरोळे (भाजप)
कोथरुड - चंद्रकांत पाटील (भाजप)
खडकवासला - भीमराव तपकीर (भाजप)
पर्वती - माधुरी मिसाळ (भाजप)
advertisement
हडपसर - चेतन तुपे (राष्ट्रवादी)
पुणे कॅन्टोन्मेंट - सुनील कांबळे (भाजप)
कसबा पेठ - मुक्ता टिळक - (भाजप) पोटनिवडणुकीनंतर रवींद्र धंगेकर (काँग्रेस)
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 17, 2024 5:57 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
हडपसर विधानसभा निवडणूक 2024 : हडपसरमध्ये दोन राष्ट्रवादींच्या लढतीत मनसेची फोडणी! तिरंगी लढतीमुळे उत्सुकता वाढली


