रावण दहन करणार की बुडवून मारायची वेळ येणार? कसं असेल दसऱ्यापर्यंत हवामान?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
महाराष्ट्रात मान्सून परतीचा प्रवास लांबणीवर पडला असून मुसळधार पावसामुळे धाराशिव, सोलापूर, नांदेड, जालना भागात शाळांना सुट्ट्या आणि जनजीवन विस्कळीत झाले आहे.
सध्या सोशल मीडियावर एक मेसेज फिरतोय रावण दहन करणार की बुडवून मारणार, मजेचा विषय सोडला तर सध्या महाराष्ट्रात अशीच परिस्थिती आहे. सप्टेंबर महिन्याच्या चौथ्या आठवड्यात मान्सूनच्या परतीचा प्रवास होणं अपेक्षित होतं. मात्र मान्सून परतीचा प्रवास लांबणीवर गेला असून सध्या कमी दाबाचा पट्टा, सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मुसळधार पाऊस राहणार आहे.
महाराष्ट्रात मान्सून अजूनही सक्रिय असून, अनेक जिल्ह्यांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. गेल्या २४ तासांत मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ढगफुटीसदृश पाऊस झाल्यामुळे शेती, घरे आणि रस्त्यांवर पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांनी नद्यांचे रूप धारण केल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २५ सप्टेंबर रोजी पूर्व-मध्य आणि उत्तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. गुजरात राज्यातून आज मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असला, तरी महाराष्ट्रातून मान्सून ५ ते १० ऑक्टोबरदरम्यान परतेल, असा अंदाज आहे.
advertisement
दसऱ्यापर्यंत अति मुसळधार पाऊस महाराष्ट्रात राहणार आहे. २६ सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्र, गोवा आणि कोकणासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये पुन्हा एकदा ढगफुटीसदृश पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे. २७ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानंतर मराठवाडा आणि विदर्भातील पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.
advertisement
हवामानातील या बदलांमुळे पुढील तीन दिवस उर्वरित महाराष्ट्राला जोरदार पाऊस झोडपून काढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. मान्सूनचा प्रवास लांबणीवर पडला आहे. 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान मान्सून परतीला प्रवासाला लागेल. मात्र तोपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस असणार आहे.
धाराशिव, जालना, नांदेड, सोलापूर भागातील काही शाळांना आज सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. धाराशिव, सोलापूर, नांदेड या भागात कंबरेहून अधिक पाणी शिरलं आहे. घरंच्या घरं पाण्याखाली गेली आहेत. महामार्गांना नदीचं स्वरुप आलं आहे. इतकी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. आभाळ फाटल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 23, 2025 7:09 AM IST