धक्कादायक! हिंगोलीत पावसाचा कहर, पुराच्या पाण्यात दोन महिला गेल्या वाहून
- Published by:Prachi Amale
Last Updated:
Hingoli Flood: अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून गुंडा गावच्या शिवारात ओढ्याला मोठा पूर आला.
मनीष खरात, प्रतिनिधी
हिंगोली: राज्याच्या विविध भागात गेल्या तीन ते चार दिवसापासून पावसानं धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर काही भागात जनजीवन देखील विस्कळीत झालं आहे. दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात देखील मोठा पाऊस झाला आहे. या पावसाने जिल्हाभरात थैमान घातले आहे. दरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. ओढ्याला आलेल्या पुरात दोन महिला वाहून गेल्याची घटना घडली आहे.
advertisement
वसमत तालुक्यातील काही भागात आज (शुक्रवार) दुपारी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून गुंडा गावच्या शिवारात ओढ्याला मोठा पूर आला. या पुराच्या पाण्यात दोन महिला वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सध्या घटनास्थळी पोलीस, महसूल पथक आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
advertisement
पाण्याचा अंदाज न आल्याने महिला गेल्या वाहून
मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी शेतमजुरी करून घरी परतत असताना महिलांना पुराच्या पाण्याचा अंदाज आला नाही. अचानक आलेल्या पुराच्या प्रवाहात त्या सापडल्या आणि वाहून गेल्या. सखुबाई भालेराव (वय 40 वर्षे) व गयाबाई सारोळे (वय 60 वर्षे, दोघी रा. गुंडा) अशी वाहून गेलेल्या महिलांची नावे आहेत. घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
advertisement
गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
गावाजवळील ओढ्यात आलेला पूर एवढा प्रचंड होता की काही मिनिटांतच पाणी रस्त्यावरून वाहू लागले. यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. गावातील नागरिकांनी तातडीने एकत्र येत महिलांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला, मात्र जोरदार प्रवाहामुळे त्यांना यश आले नाही. यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांना आणि महसूल प्रशासनाला घटनेची माहिती दिली.
advertisement
शोधकार्य सुरू
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. ओढ्यातील पाण्याचा वेग कमी होताच शोधकार्य गतीमान करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापन पथकालाही सतर्क करण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांचाही शोध मोहिमेत सक्रिय सहभाग असून मोठ्या संख्येने गावकरी घटनास्थळी जमले आहेत.
ढगफुटीमुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान
advertisement
वसमत तालुक्यात अचानक झालेल्या ढगफुटीमुळे शेतातील पिकांचेही मोठे नुकसान झाले असल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे. पावसामुळे रस्ते आणि शेतमळे पाण्याखाली गेले आहेत. ही घटना घडल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. दोन्ही महिलांचा शोध लवकरात लवकर लागावा, अशी अपेक्षा गावकऱ्यांकडून केली जात आहे.
Location :
Hingoli,Maharashtra
First Published :
September 12, 2025 9:23 PM IST