Jalgaon Raksha Khadse : नातीची छेड काढली, आजोबा आक्रमक, आरोपींचा 'आका' कोण? नाथाभाऊंचे अतिशय गंभीर आरोप
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Jalgaon News : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काही टवाळखोर पोरांनी काढल्याची धक्कादायक घटना जळगावमध्ये घडली. या सगळ्या प्रकारावर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी संताप व्यक्त केला.
जळगाव: केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काही टवाळखोर पोरांनी काढल्याची धक्कादायक घटना जळगावमध्ये घडली. रक्षा खडसे यांची मुलगी आणि त्यांच्या मैत्रिणी यात्रेत गेल्या होत्या. त्यावेळी त्यांची छेड काढण्यात आली. इतकंच नाही तर त्यांच्या सोबत असणाऱ्या सुरक्षारक्षकांनाही संबंधित टवाळखोरांनी त्यांनाही धक्काबुक्की केली. या सगळ्या प्रकारावर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी संताप व्यक्त केला. मुलींची छेडछाड काढणाऱ्यांचा आका राजकीय नेता असल्याचा संशय असल्याचे त्यांनी सांगितले.
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील यात्रा महोत्सवात काही टवाळखोर तरुणांनी भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे मुलीसह अन्य मुलींची छेड काढली. टवाळखोर मुलांविरोधात सुरक्षारक्षकाच्या तक्रारीवरून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर, रक्षा खडसे यांनीदेखील आरोपींवर कारवाई करावी यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली. रक्षा खडसे यांचे सासरे आणि राष्ट्रवादी पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी या गुंडाना राजकीय अभय असल्याचा आरोप केला.
advertisement
एकनाथ खडसे यांनी काय म्हटले?
एकनाथ खडसे यांनी न्यूज 18 सोबत बोलताना सांगितले की, महिलांच्या संदर्भात घटना वाढत आहेत. पण घटना होऊ नये यासाठी पोलिसांनी आपला धाक वाढवायला हवा. मंत्र्यांच्या घरच्या सदस्यांबाबत असे प्रकार होत असतील तर सामान्यांचे काय असा सवालही त्यांनी केला. घटना घडली तेव्हा पोलीस उपस्थित होते. पोलिसांना शिविगाळ, धक्काबुक्की करण्यात आली. इतकी हिंमत गुंडाची झाली आहे.
advertisement
विधीमंडळात मुद्दा उपस्थित करूनही काहीच कारवाई होत नसल्याची खंत खडसे यांनी व्यक्त केली. आमच्याकडे हे प्रकार वारंवार होत आहेत. शालेय मुलींचीदेखील छेडछाड करण्यात येते. आता तरी घटनेची नोंद घेऊन पोलीस आपला धाक बसवतील अशी अपेक्षा खडसे यांनी व्यक्त केली.
गुंडांचा आका कोण?
एकनाथ खडसे यांनी पुढे म्हटले की, असे प्रकार करणारे गुंड कोण आहेत हे पोलीस अधीक्षक, डीआयजींना माहित आहेत. तरीदेखील कारवाई होत नाही. या गुंडांना राजकीय संरक्षण असल्याचा आरोपही खडसे यांनी केला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना गुंडावर कारवाई झाली नाही. मागच्या सरकारच्या काळात अशा घटना घडल्या. त्यावेळी पोलिसांना कारवाई करण्यास सांगितले. मात्र, आरोपींवर राजकीय वरदहस्त आहे. या गुंडांना पोलिसांनी ताब्यात घेतले की लगेच सुटका व्हायची मुख्यमंत्र्यांकडून फोन आलाय, असे पोलीस सांगायचे. या टोळीला राजकीय संरक्षण असून स्थानिक आमदाराचे अभय असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला.
view commentsLocation :
Jalgaon,Jalgaon,Maharashtra
First Published :
March 02, 2025 11:50 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Jalgaon Raksha Khadse : नातीची छेड काढली, आजोबा आक्रमक, आरोपींचा 'आका' कोण? नाथाभाऊंचे अतिशय गंभीर आरोप


