आईवरचा राग मुलीवर काढला, गावातला तरुण घरात घुसला अन्..., जळगावातील संतापजनक घटना!
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Jalgaon : जळगाव जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील एका गावात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गावातल्या एका तरुणाने अकरा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे.
अमळनेर: जळगाव जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील एका गावात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथे एका तरुणाने अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपीनं थेट घरात घुसून पीडित मुलीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र पीडित मुलीनं प्रसंगावधान दाखवत आरडाओरडा केला. यामुळे मोठा अनर्थ टळला. मुलीनं आरडाओरडा करताच आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.
मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याचं समजताच पीडित मुलीच्या आईनं अमळनेर पोलीस ठाण्यात जात आरोपीविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
नेमकी घटना काय?
अमळनेर तालुक्यातील एका गावात काही दिवसांपूर्वी पीडित मुलीच्या आईचा गावातील काही जणांसोबत वाद झाला होता. या वादानंतर पीडितेच्या आईनं गावातील 35 जणांविरोधात फिर्याद दाखल केली होती. ही फिर्याद मागे घ्यावी, यासाठी आरोपी पीडितेच्या आईवर दबाव टाकत होते. मात्र त्यांनी फिर्याद मागे घेतली नाही. याचाच बदला घेण्यासाठी आरोपीनं तक्रारदार महिलेच्या 11 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.
advertisement
घटनेच्या दिवशी फिर्यादी महिला कपडे वाळायला घालण्यासाठी गच्चीवर गेल्या होत्या. त्यावेळी अचानक तिच्या 11 वर्षीय मुलीचा ओरडण्याचा आवाज आला. मुलीच्या किंकाळ्या ऐकून तक्रारदार महिला तातडीने घरात आल्या. यावेळी गावातील भाऊसाहेब उर्फ प्रशांत अशोक बोरसे हा तरुण झोक्याजवळ उभा होता. त्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तो पळून गेला. यानंतर महिलेनं आपल्या मुलीला हकीकत विचारली तेव्हा भाऊसाहेब याने घरात घुसून तुझ्या भावाला मारून टाकेल अशी धमकी दिली आणि अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, असं मुलीनं सांगितलं. ते ऐकून फिर्यादी महिला आरोपीच्या घरी गेली. इथे भाऊसाहेबच्या आईने पीडितेच्या आईचं काहीही ऐकून न घेता शिवीगाळ करायला सुरुवात केली. तसेच तुम्ही आमच्याविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीत ३५ जणांची नावे टाकली आहेत, ती कमी न केल्यास आम्ही असेच करत राहू, अशी धमकी दिली. यानंतर पीडितेच्या आईनं अमळनेर पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
Location :
Jalgaon,Maharashtra
First Published :
Jan 05, 2025 7:21 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
आईवरचा राग मुलीवर काढला, गावातला तरुण घरात घुसला अन्..., जळगावातील संतापजनक घटना!










