जळगावात टँकरनं दोघांना चिरडलं, नागरिकांकडून एरंडोल महामार्गवर चक्काजाम
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Accident in Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे भीषण अपघाताची घटना घडली आहे. इथे एका भरधाव वेगात येणाऱ्या टँकरने दोन जणांना चिरडलं आहे.
नितीन नांदुरकर, प्रतिनिधी जळगाव : जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे भीषण अपघाताची घटना घडली आहे. इथे एका भरधाव वेगात येणाऱ्या टँकरने दोन जणांना चिरडलं आहे. दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची घटना समोर आल्यानंतर संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी एरंडोल महामार्गावर रस्ता रोको केला असून जोपर्यंत राष्ट्रीय महामार्गावर अंडर बायपास होणार नाही, तोपर्यंत आंदोलन मागं घेणार नाहीं, असा पवित्रा घेतला आहे. रास्ता रोकोमुळे जळगाव-पारोळा दरम्यान, वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे.
दिपक रामकृष्ण भोई आणि राजेंद्र भिला भोई असं अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावं आहे. घटनेच्या दिवशी दोघंही दुचाकीनं नॅशनल हायवे क्रमांक सहावरून जात होते. जळगाव-पारोळा रोड दरम्यान असलेल्या एरंडोल येथील शनी मंदिराजवळून जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या टँकरने त्यांना जोरदार धडक दिली. यात धडकेत दिपक रामकृष्ण भोई, राजेंद्र भिला भोई या दोघांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी संतप्त नागरिकांनी एरंडोल महामार्गावर टायर पेटवत रास्ता रोको आंदोलन सुरू केले.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या नऊ महिन्यापूर्वी एरंडोल येथील नागरिकांनी महामार्गावर होणारे अपघात लक्षात घेता अंडर बायपास एरंडोल येथे व्हावा आणि त्याच्या बाजूला समांतर रस्ते व्हावे, या मागणीसाठी आंदोलन केलं होतं. मात्र लेखी आश्वासन देऊनही यावर कुठलाही तोडगा निघाला नाही. यामुळे नऊ महिने उलटूनही कामाला सुरुवात न झाल्याने एरंडोलसह आसपासच्या परिसरातील नागरिकांनी रास्ता रोको करत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. जोपर्यंत अंडर बायपासच्या कामाला महामार्ग प्रशासन सुरुवात करणार नाही तोपर्यंत आमचे हे आंदोलन सुरूच राहील, असा पवित्रा यावेळी स्थानिकांनी घेतला आहे.
Location :
Jalgaon,Maharashtra
First Published :
Dec 23, 2024 9:25 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
जळगावात टँकरनं दोघांना चिरडलं, नागरिकांकडून एरंडोल महामार्गवर चक्काजाम










