पालघर साधू हत्याकांडात भाजपने ज्यांच्यावर आरोप केले त्याच काशिनाथ चौधरींच्या हाती कमळ!
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Palghar Politics: राष्ट्रवादी शरद पवार गटाचे स्थानिक नेते काशिनाथ चौधरी यांच्यावर भारतीय जनता पक्षाने गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणात जोरदार आरोप केले. त्याच चौधरींनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला.
राहुल पाटील, प्रतिनिधी, पालघर : पालघर जिल्ह्यातील गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मुख्य आरोपी म्हणून काशिनाथ चौधरी यांच्यावर आरोपांची राळ उडवली होती. त्याच काशिनाथ चौधरी यांनी रविवारी नगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशानंतर भाजपने केलेल्या आरोपांचे काय झाले? असा प्रश्न जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विचारीत आहेत.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे स्थानिक नेते काशिनाथ चौधरी यांच्यावर भारतीय जनता पक्षाने गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणात जोरदार आरोप केले. काशिनाथ चौधरी हेच साधू हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचे सांगून राज्यात रान उठवले. तसेच साधू हत्याकांड प्रकरणावरून संधी मिळताच तत्कालिन ठाकरे सरकारवर अनेक गंभीर आरोप केले. साधू हत्याकांड सहन झाले नाही म्हणूनच उठाव केला असे सांगायला देखील एकनाथ शिंदे यांनी मागे पुढे पाहिले नाही. आता ज्यांच्यावर आरोप केले तेच काशिनाथ चौधरी भाजपमध्ये आल्याने त्या आरोपांचे काय झाले? असे विरोधक विचारीत आहेत.
advertisement
साधू हत्याकांडाचे ज्यांच्यावर आरोप त्यांच्याच हाती कमळ
पालघर जिल्ह्यात जोरदार शक्ती प्रदर्शन करत चौधरी यांनी भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. खासदार हेमंत सावरा आणि भाजप जिल्हाध्यक्ष भरत रजपूत यांच्या उपस्थितीत डहाणू येथे चौधरी यांनी शक्तिप्रदर्शन करत कमळ हाती घेतले. काशिनाथ चौधरी यांच्यासोबत 3 हजारांहून अधिक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला .
advertisement
पालघर साधू हत्या प्रकरण नेमके काय?
१६ एप्रिलच्या 2022 रात्री सुरतकडे निघालेल्या दोन साधू व त्यांच्या चालकांची गडचिंचले येथे जमावाकडून अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी २०० जणांना अटक केली होती. या प्रकरणात १०८ साक्षीदारांचा जबाब नोंदवला गेला.
भाजप-शिवसेनेने ठाकरे-पवारांवर आरोपांची राळ उडवली होती
पालघर साधू हत्याकांड हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात घडले होते. त्यावेळी ठाकरे सरकारवर भारतीय जनता पक्षाने आरोपांची राळ उडवली होती. तसेच एकनाथ शिंदे यांनी बंड करणाऱ्या कारणांपैकी साधू हत्या हे एक कारण सांगून गुवाहाटीला गेल्याचे सांगितले होते. साधूंची हत्या आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नव्हतो, असे विधान त्यांनी शिवसेनेच्या बंडानंतर केले.
view commentsLocation :
Palghar,Thane,Maharashtra
First Published :
November 16, 2025 4:26 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पालघर साधू हत्याकांडात भाजपने ज्यांच्यावर आरोप केले त्याच काशिनाथ चौधरींच्या हाती कमळ!


