Shiv Sena UBT On KDMC : कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत्ते उघडले....
- Reported by:susmita Bhadane patil
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Shiv Sena UBT On Kalyan Dombivli : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असतानाच, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
मुंबई/कल्याण: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असतानाच, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. युतीत निवडणूक लढवल्यानंतर मनसेने शिंदे गटाला आपला पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली होती. त्यातच ठाकरे गटाचे चार नगरसेवक फुटल्याची चर्चा सुरू आहे. अशातच ठाकरे गट कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. त्यावर आता ठाकरे गटाने आपल्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे ११ उमेदवार विजयी झाले होते. त्यापैकी चार नगरसेवक बेपत्ता आहेत. त्यापैकी दोन शिंदे गट आणि दोन मनसेकडे गेल्याचे म्हटले जात आहे. ठाकरे गटानेही विकासासाठी सोबत यावे असे आवाहन महायुतीकडून करण्यात आले. त्यानंतर आज मातोश्रीवर ठाकरे गटाच्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या नगरसेवकांची बैठक पार पडली.
या बैठकीनंतर ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी माहिती देताना मोठी घोषणा केली. "आम्ही महापालिकेत सत्ताधाऱ्यांच्या गोटात न जाता सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावणार आहोत," अशी घोषणा युवासेना सरचिटणीस आणि आमदार वरुण सरदेसाई यांनी केली आहे. 'मातोश्री'वर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि केडीएमसीतील नवनिर्वाचित नगरसेवकांच्या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.
advertisement
महापालिकेत घोडेबाजार सुरू
वरुण सरदेसाई यांनी सत्तास्थापनेच्या प्रक्रियेवर गंभीर आरोप केले आहेत. "कल्याण-डोंबिवलीत सध्या मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार पाहायला मिळत आहे. मात्र, आमची निवडणूक ही थेट भाजप आणि शिंदे गटाच्या विरोधात होती. त्यामुळे जनतेने दिलेला कौल स्वीकारून आम्ही त्यांच्यासोबत न जाता विरोधी बाकावर बसण्याचा निर्णय घेतला आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.
advertisement
मनसेवर नाराजी
यावेळी सरदेसाई यांनी मनसेचे आमदार राजू पाटील यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "मनसेने सत्तेबाबत निर्णय घेण्यापूर्वी किमान आमच्याशी चर्चा करायला हवी होती, मात्र त्यांनी तसे केले नाही," अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.
फुटण्याच्या तयारीत असलेल्या नगरसेवकांना कडक इशारा
ठाकरे गटाचे काही नगरसेवक संपर्कात नसल्याच्या चर्चेवर सरदेसाई यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. "आमच्या चिन्हावर निवडून आलेले ४ नगरसेवक अद्याप संपर्कात नाहीत, त्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही. त्यांच्याशी पुन्हा चर्चा करू, मात्र ते न परतल्यास त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी म्हटले. "ज्या मतदारांनी तुम्हाला ५ वर्षांसाठी निवडून दिले आहे, त्यांच्यासमोर कोणत्या तोंडाने जाणार आहात?" असा सवालही त्यांनी बंडखोर नगरसेवकांना विचारला आहे. ठाकरे गटाने आपल्या चार नगरसेवकांचे हरवले आहेत या आशयाचे पोस्टर लावले आहेत. हे राजकारण जनतेला पटलं नाही, त्यामुळेच पोस्टर लागले असल्याचे सरदेसाई यांनी म्हटले.
Location :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
Jan 25, 2026 2:52 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Shiv Sena UBT On KDMC : कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत्ते उघडले....






