पत्नीशी करत होता चॅटिंग, पती तुरुंगातून आला बाहेर, 'त्या' तरुणाचं केलं अपहरण अन् इतका मारला की...
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात मोबाईलवर चॅटिंग केल्याच्या संशयावरून एक धक्कादायक घटना घडली. सराईत गुन्हेगार ऋतुराज दत्तात्रय भिलगुडे (25) याने...
कोल्हापूर : पत्नीशी मोबाईलवर चॅटिंग केल्याच्या रागातून एका सराईत गुन्हेगाराने आपल्या साथीदारांच्या मदतीने एका तरुणाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात घडली आहे. ऋतुराज दत्तात्रय भिलगुडे (वय-25, रा. मोरेवाडी, ता. करवीर) असे या मुख्य आरोपीचे नाव असून, त्याच्या पाच सहकाऱ्यांनी मिळून आदिनाथ कृष्णात कुईगडे (वय-30, रा. शिंगणापूर, ता. करवीर) याचे अपहरण केले. हा प्रकार रविवार (27 जुलै) रात्री घडला. या प्रकरणी आदिनाथची पत्नी श्रुतिका कुईगडे यांनी करवीर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सहा आरोपींना अटक केली आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि 'त्या' चॅटिंगचे कनेक्शन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या आरोपींमध्ये ऋतुराज भिलगुडे याच्यासह आकाश ऊर्फ करण दत्तात्रय भिलगुडे (वय 28), अक्षय सुरेश भिलगुडे (वय 28), अभय बाळासाहेब मोरे (वय 23) आणि कुलदीप साताप्पा कोथळे (वय 28) यांचा समावेश आहे. मुख्य आरोपी ऋतुराज भिलगुडे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्याला यापूर्वी विना परवाना पिस्तूल बाळगल्याप्रकरणी दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. 20 जुलै रोजीच त्याची सुटका झाली होती. ऋतुराज तुरुंगात असताना, आदिनाथ हा त्याच्या पत्नीसोबत मोबाईलवर मेसेज पाठवून चॅटिंग करत होता.
advertisement
दार तोडून घरात घुसले, जबरदस्तीने उचलून नेले
ऋतुराज तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याच्या पत्नीने आदिनाथच्या चॅटिंगबद्दल त्याला सांगितले. हे ऐकून ऋतुराज चांगलाच संतापला. त्याने आपल्या पाच साथीदारांना सोबत घेऊन आदिनाथच्या शिंगणापूर येथील घरी धाव घेतली. रात्रीच्या वेळी त्यांनी थेट घराचा दरवाजा तोडला आणि आत प्रवेश केला. आदिनाथला घरातूनच जबरदस्तीने उचलून पांढऱ्या रंगाच्या एका कारमध्ये बसवून घेऊन गेले.
advertisement
गाडीतच बेदम मारहाण, जखमी अवस्थेत सोडून पळ काढला
अपहरण केल्यानंतर आदिनाथला गाडीतच बेदम मारहाण करण्यात आली. आरोपींनी कातडी पट्टा, काठी, सळई आणि लाथा-बुक्क्यांनी त्याला मारले. मारहाणीत आदिनाथ गंभीर जखमी झाला. त्याची अवस्था पाहून अपहरणकर्त्यांनी त्याला वाटेतच सोडून पळ काढला. जखमी अवस्थेतील आदिनाथला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांची तत्परता आणि आरोपींना अटक
या घटनेची माहिती मिळताच आदिनाथच्या पत्नीने करवीर पोलीस ठाण्यात धाव घेत पतीचे अपहरण झाल्याची फिर्याद दिली. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखत अपहरणकर्त्यांचा शोध सुरू केला. तातडीने केलेल्या कारवाईमुळे पोलिसांनी या गुन्ह्यातील सहाही आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
advertisement
हे ही वाचा : भावाला वाचवले पण स्वतः बुडाला! 21 वर्षीय तरुणाचा जोगेश्वरी धबधब्यात दुर्दैवी अंत, पर्यटकांनो, सावध व्हा!
Location :
mum
First Published :
July 29, 2025 11:54 AM IST
मराठी बातम्या/कोल्हापूर/
पत्नीशी करत होता चॅटिंग, पती तुरुंगातून आला बाहेर, 'त्या' तरुणाचं केलं अपहरण अन् इतका मारला की...