Kolhapur Rain: कोल्हापुरात ढगफुटी, राजाराम बंधाऱ्यावर कचऱ्याची लाट, तब्बल 50 टन कचऱ्याचा डोंगर
- Published by:Mohan Najan
- Reported by:Niranjan Kamat
Last Updated:
पावसाच्या माऱ्याने कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्यावर नाल्यामधून वाहून आलेल्या कचऱ्याचा मोठा ढीग साचला आहे. यामध्ये नागरिकांनी बेफिकिरीने फेकलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या आणि इतर कचऱ्यासह मृत मासेही मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत.
कोल्हापूर: गुरुवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने कोल्हापूर शहर आणि जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले. या मुसळधार पावसामुळे ओढे-नाले तुडुंब भरून वाहू लागले, तर शाळा आणि कार्यालयांतून घरी परतणाऱ्या विद्यार्थी आणि नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. या पावसाच्या माऱ्याने कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्यावर नाल्यामधून वाहून आलेल्या कचऱ्याचा मोठा ढीग साचला आहे. यामध्ये नागरिकांनी बेफिकिरीने फेकलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या आणि इतर कचऱ्यासह मृत मासेही मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. या कचऱ्यामुळे बंधाऱ्याचे सौंदर्य आणि स्वच्छता धोक्यात आली आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी विजय पाटील यांनी सांगितले की, बंधाऱ्यावर साचलेला कचरा काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सध्या सुमारे 50 टनांहून अधिक कचरा निघण्याची शक्यता आहे. यामध्ये प्लास्टिकचा कचरा आणि मृत मासे यांचा समावेश आहे. हे काम पूर्ण होण्यास आणखी दोन ते तीन तास लागू शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक नागरिकांनी कचऱ्याच्या समस्येवर चिंता व्यक्त करत महानगरपालिकेकडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
advertisement
पर्यावरणप्रेमींनी नागरिकांना कचरा वर्गीकरण करून तो योग्य ठिकाणी टाकण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी प्लास्टिक आणि इतर कचरा उघड्यावर फेकणे थांबवले पाहिजे. यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचते आणि पाण्याचा दर्जा खालावतो, असे पर्यावरण कार्यकर्ते संजय कांबळे यांनी सांगितले. कचऱ्याच्या या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास नदी आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम होऊ शकतात, अशी भीती व्यक्त होत आहे. महानगरपालिकेने स्वच्छता मोहीम तीव्र करावी, अशी मागणीही जोर धरत आहे.
view commentsLocation :
Kolhapur,Maharashtra
First Published :
June 13, 2025 2:20 PM IST
मराठी बातम्या/कोल्हापूर/
Kolhapur Rain: कोल्हापुरात ढगफुटी, राजाराम बंधाऱ्यावर कचऱ्याची लाट, तब्बल 50 टन कचऱ्याचा डोंगर