बिबट्या आला रे आला! शिरूर तालुक्यात बिबट्याच्या प्रत्येक हालचालीवर 'AI'ची नजर; सेकंदांत मिळणार धोक्याचा अलर्ट
Last Updated:
Shirur News : शिरूर तालुक्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. येथील घरांच्या परिसरात बिबट्याच्या हालचालीवर आता AI तंत्रज्ञानाची नजर असणार आहे.
पुणे : शिरूर तालुका आणि त्यासोबतच्या असलेल्या काही गावात गेल्या काही वर्षांपासून बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे मोठ्या प्रमाणात समस्यांचा सामना करावा लागतो आहे. या काळात अनेक नागरिकांनी जीव गमावला गेला असून, पशुधनाचे मोठे नुकसानही झाले आहे.
शिरूर, आंबेगाव, जुन्नर आणि खेड तालुके हे बिबट्याप्रवण क्षेत्र म्हणून अधिकृतपणे घोषित केले गेले आहेत. गेल्या पाच वर्षांत या भागातील अनेक प्राणी हल्ल्यांमध्ये बळी गेले आहेत, त्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीती आणि दहशत पसरली आहे.
या पार्श्वभूमीवर मानव आणि बिबट्यांमधील संघर्ष कमी करण्यासाठी शिरूर तालुक्यातील बाराही अतिसंवेदनशील गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित अलर्ट सिस्टीम प्रायोगिक तत्त्वावर राबविण्याचे निर्णय घेण्यात आले आहेत.
advertisement
ही अत्याधुनिक प्रणाली बिबट्यांच्या हालचालींचे निरीक्षण करते आणि त्यांच्या शरीरावरील पॅटर्न ओळखून त्वरित सायरनद्वारे सतर्कतेचा इशारा देते. यामुळे आसपासच्या नागरिकांना बिबट्यांच्या उपस्थितीची तत्काळ माहिती मिळेल, ज्यामुळे संभाव्य हल्ले टाळता येऊ शकतात.
ही AI-आधारित अलर्ट प्रणाली पिंपरखेड, जांबूत, मांडवगण, फरादा येथील पिंपळमळा, फराटेवाडी, शिवनगर, इनामगाव, फिरंगीमळा, पिंपळसूटी, धायतडक वस्ती, करडे, आण्णापूर, संगमवाडी, म्हसे बुद्रुक, आमदाबाद आणि निमगाव दुडे या गावांमध्ये स्थापित करण्यात आली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना बिबट्यांच्या संभाव्य हल्ल्यांपासून संरक्षण मिळण्याची शक्यता वाढली आहे.
advertisement
या उपक्रमाचे मार्गदर्शन जुन्नरचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे आणि सहायक वनसंरक्षक स्मिता राजहंस यांच्या देखरेखीखाली शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे आणि वनविभागातील कर्मचाऱ्यांनी केले आहे. प्रणाली यशस्वीरीत्या कार्यरत असून तिच्या माध्यमातून बिबट्यांच्या हालचालींवर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवता येणार आहे.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, AI-आधारित अलर्ट सिस्टीममुळे नागरिकांचे संरक्षण करण्यास मोठा हातभार लागेल. यामुळे केवळ प्राणी हल्ल्यांपासून बचाव होणार नाही तर नागरिकांची सुरक्षा वाढेल. स्थानिक प्रशासन आणि वन विभागाच्या या प्रयत्नामुळे मानव-बिबट्यांच्या संघर्षाला तोंड देणे सुलभ होणार आहे आणि भविष्यातील संभाव्य आपत्तींना वेळेवर रोखता येईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 02, 2025 9:07 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बिबट्या आला रे आला! शिरूर तालुक्यात बिबट्याच्या प्रत्येक हालचालीवर 'AI'ची नजर; सेकंदांत मिळणार धोक्याचा अलर्ट