पुणे शहरातही बिबट्याचे दर्शन, कुंभारवाड्यात लोकांना धडकी भरली, वन विभागाचं सर्च ऑपरेशन
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
सलग दुसऱ्या दिवशी मुंढवा केशवनगरमध्ये बिबट्याचे दर्शन झाले असून वनविभागाकडून अलर्ट देण्यात आला आहे. वनविभागाचे सर्च ऑपरेशन सुरू आहे.
अभिजीत पोते, प्रतिनिधी, पुणे : पुणे शहरातील मुंढवा–केशवनगर परिसरात बिबट्याची दहशत कायम असून, सलग दुसऱ्या दिवशी बिबट्याचं दर्शन झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. केशवनगरमधील कुंभारवाडा परिसरात आज सकाळी सुमारे ५ वाजताच्या सुमारास पुन्हा एकदा बिबट्या दिसून आला.
विशेष म्हणजे, याच परिसरात काल पहाटे सुमारे ४ वाजताच्या सुमारासही बिबट्याचं दर्शन झालं होतं. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. स्थानिक नागरिकांनी बिबट्या दिसल्याची माहिती तात्काळ वनविभागाला दिली. माहिती मिळताच वनविभागाने तातडीने हालचाली सुरू करत संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे.
बिबट्या नेमका कुठून आला आणि सध्या कुठे आहे, याचा शोध घेण्यासाठी वनविभागाचे पथक तैनात करण्यात आले आहे. वनविभागाकडून परिसरातील सर्व सोसायट्यांमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात येत आहे. बिबट्याची हालचाल कोणत्या मार्गाने झाली, तो कुठे थांबला किंवा कुठे गेला, याचा मागोवा घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज अत्यंत महत्त्वाचे ठरते.
advertisement
बिबट्याला अचूकपणे ट्रॅक करण्यासाठी ट्रॅप कॅमेरेही विविध ठिकाणी बसवण्यात आले आहेत. याशिवाय, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत थर्मल ड्रोन सर्वेलियन्स करण्याचा निर्णयही वनविभागाने घेतला आहे.
दरम्यान, नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वनविभागाने परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच, लहान मुलांना आणि पाळीव प्राण्यांना विशेष काळजीपूर्वक घरातच ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बिबट्याच्या सलग दोन दिवसांच्या हालचालींमुळे मुंढवा–केशवनगर परिसरात भीतीचं वातावरण असलं, तरी वनविभाग परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 19, 2025 9:11 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पुणे शहरातही बिबट्याचे दर्शन, कुंभारवाड्यात लोकांना धडकी भरली, वन विभागाचं सर्च ऑपरेशन









