Ahmednagar : राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने नगरमध्ये 'राम'राज्य? विखेंची धाकधूक वाढणार!
- Published by:Shreyas
Last Updated:
अयोध्येत राम मंदिर झाल्यानंतर नगरमध्ये रामराज्य येणार आहे, दोन आमदारांचं यावर एकमतही झालं आहे, मात्र यामुळे सुजय विखे पाटील यांची धाकधूक वाढली आहे.
साहेबराव कोकणे, प्रतिनिधी
अहमदनगर : अयोध्येत राम मंदिर झाल्यानंतर नगरमध्ये रामराज्य येणार आहे, दोन आमदारांचं यावर एकमतही झालं आहे, मात्र यामुळे सुजय विखे पाटील यांची धाकधूक वाढली आहे. भाजप आमदार राम शिंदे आणि अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांनी एकत्रितपणे मोहटादेवीचं दर्शन घेतलं. दिवाळीतला राजकीय फराळ त्यानंतर कोरठणमधील खंडोबाच्या यात्रेमध्येही दोघं एकत्र आले होते. या दोन्ही आमदारांनी एकत्रित येण्यामागेही एक कारण आहे.
advertisement
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना पुन्हा तिकीट मिळेल अशी चर्चा सुरू आहे. मात्र भाजपचेच आमदार राम शिंदे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले. त्यातच काही दिवसांपूर्वी आमदार निलेश लंके यांच्यासोबत सुजय विखे पाटील यांचे राजकीय खटके उडाले होते. परिणामी शत्रूचा शत्रू आपला मित्र या न्यायाने दोन्ही आमदारांनी त्यांची मैत्री घट्ट केली आहे.
advertisement
'हिंदूस्तानात उत्साहाचं वातावरण आहे, या उत्साहाच्या वातावरणात संपूर्ण देशात रामलल्लांची लहर आहे. 500 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर प्राण प्रतिष्ठा झाली आहे. देशात रामराज्य येणार, पण नगर जिल्ह्यातही रामराज्य येणार', असं सूचक विधान राम शिंदे यांनी केलं आहे. भाजपचे आमदार राम शिंदे यांच्या नावातच राम आहे आणि राम शिंदे खासदार झाले तर जिल्ह्यात आपसुकच रामराज्य येईल, असाही त्यांच्या वक्तव्याचा अर्थ निघतो.
advertisement
दुसरीकडे अजित पवार गटाचे आमदार निलेश लंकेही राम शिंदेंच्या रामराज्यासाठी आतूर झाले आहेत. जेव्हा आम्ही दोघं एकत्र येतो तेव्हा मीच सारथ्य करतो, असं सांगायलाही निलेश लंके विसरले नाहीत. 'अयोध्येमध्ये रामाचं आगमन झालं आहे. नगर जिल्ह्यातही रामाचं राज्य येणार आहे. आम्हीही खंडेरायाला प्रार्थना केली आहे. ते राम आहेत, मी त्यांचा सारथी आहे', असं लंके म्हणाले.
advertisement
राम शिंदेंना खासदार करण्यासाठी अजित पवार गट जिल्ह्यात सरसावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. असं झालं तर विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना पुन्हा खासदारकीचं तिकीट मिळणार की नाही? असा प्रश्न निर्माण झालाय. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपच्याच आमदार-खासदारामध्ये तिकीटावरून चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यात रामराज्य कुणाच्या नेतृत्वात येणार? हा प्रश्न निर्माण झालाय. राम शिंदे की सुजय विखे पाटील यांच्यापैकी कुणावर भाजप नेतृत्व रामराज्याची धुरा देतं? हे लवकरच स्पष्ट होईल.
Location :
Ahmadnagar,Maharashtra
First Published :
Jan 28, 2024 11:53 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ahmednagar : राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने नगरमध्ये 'राम'राज्य? विखेंची धाकधूक वाढणार!







