Maharashtra Elections : मोठी बातमी! महायुतीचा जागा वाटपाचा तिढा आजच सुटणार, फॉर्म्युलाही जाहीर होणार!
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Maharashtra Assembly Elections : महायुतीदेखील आजच आपल्या जागा वाटपावर अंतिम निर्णय घेणार आहे. महायुती जागा वाटपाचा फॉर्म्युला आजच जाहीर करण्याची शक्यता आहे.
तुषार रुपनवार, प्रतिनिधी, मुंबई : राज्यात विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. तर, दुसरीकडे सत्ताधारी महायुती आणि विरोधी बाकांवरील महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटला नाही. या आघाडी-युतीमधील प्रत्येक पक्षाने चर्चेत सुटलेल्या जागेवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. मविआत चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असताना दुसरीकडे महायुतीदेखील आजच आपल्या जागा वाटपावर अंतिम निर्णय घेणार आहे. महायुती जागा वाटपाचा फॉर्म्युला आजच जाहीर करण्याची शक्यता आहे.
महायुतीमध्ये भाजपने 99, शिवसेनेने 45 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही 49 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महायुतीतील 11 जागांचा तिढा आजच सुटणार आहे. महायुतीचा अंतिम फॉर्म्युलादेखील आजच जाहीर होणार. महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा कोणत्याही परिस्थितीत आजच मिटवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज संध्याकाळी देवेंद्र फडणवीस यांच्या 'सागर' या शासकीय निवासस्थानी बैठक होणार आहे.
advertisement
महायुतीमध्ये मुंबईसह इतर काही ठिकाणच्या जागांवरून तिढा सुरू आहे. जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्याठिकाणी सूत्र निश्चित झाल्यानंतर राज्यातच अंतिम निर्णय घेऊन जागा वाटप करावे असे अमित शहा यांनी सांगितले. त्यानंतर आता राज्यात जागा वाटपावरून चर्चा सुरू आहे.
जागा वाटपात मुंबईतील चेंबूर, दिंडोशी, वरळी, शिवडी, वर्सोवा, धारावी, आष्टी, अक्कलकुआ, करमाळा या जागांवर वाद असल्याची चर्चा आहे. गेवराईवरही भाजपने दावा केला होता. मात्र, अजित पवारांच्या राष्ट्रवादीने गेवराईतून उमेदवार जाहीर केला. तर, कोल्हापूर उत्तर ही जागा शिवसेना शिंदे गटाला सुटली.
advertisement
आष्टीतून भाजपकडून सुरेश धस इच्छुक तर या ठिकाणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे हे आमदार आहेत. ते देखील पुन्हा प्रयत्न करत आहेत. दिंडोशी मतदारसंघावर शिवसेनेकडून वैभव पराडकर आणि भाजपकडून राजहंस सिंग इच्छुक आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचे आतापर्यंतचे जागा वाटप:
• भारतीय जनता पार्टी (BJP): 121
• शिवसेना (शिंदे गट): 45
advertisement
• राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट): 49
• एकूण जाहीर जागा: 215
• बाकी जागा (ज्यांवर उमेदवार जाहीर करायचे आहेत): 73
• एकूण जागा: 288
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 27, 2024 1:03 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections : मोठी बातमी! महायुतीचा जागा वाटपाचा तिढा आजच सुटणार, फॉर्म्युलाही जाहीर होणार!








