महाविकास आघाडीकडून राज्यसभेवर कोण जाणार? अखेरच्या क्षणी शरद पवार डाव टाकणार? नव्या चेहऱ्याला संधी?
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
मूळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भागवत कराड, फौजिया खान, प्रियांका चतुर्वेदी, रजनी पाटील, धैर्यशील पाटील या सदस्यांची राज्यसभेची मुदत संपुष्टात येत आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील सात राज्यसभा खासदारांची मुदत संपुष्टात येत असल्याने मार्च महिन्यात याच सात जागांसाठी निवडणूक होणार आहे. बुधवारी निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून १६ मार्च रोजी मतदान होणार आहे. राज्यसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर महाविकास आघाडीत बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार महाविकास आघाडीकडून केवळ एक सदस्य निवडून जाऊ शकतो. त्यामुळे तिन्ही पक्ष विचाराअंती कुणाला संधी देणार याकडे लक्ष लागले आहे.
मूळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भागवत कराड, फौजिया खान, प्रियांका चतुर्वेदी, रजनी पाटील, धैर्यशील पाटील या सदस्यांची राज्यसभेची मुदत संपुष्टात येत आहे. सध्याच्या विधानसभेतील संख्याबळानुसार यापैकी सहा जागांवर महायुतीचे सदस्य बिनविरोध निवडून जाऊ शकतात. उर्वरित एका जागेवर महाविकास आघाडीचा एक सदस्य कोण, शरद पवार पुन्हा राज्यसभेवर जाण्यास इच्छुक आहेत का? असे प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.
advertisement
राष्ट्रवादीची भूमिका काय?
शरद पवार जर राज्यसभेवर जाणार असतील तर काँग्रेस आणि शिवसेना विरोध करणार नाही, हे स्पष्ट आहे. परंतु राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू असताना आणि त्यानंतर राष्ट्रवादीची भूमिका सत्तेत जाण्याची असेल का, हे स्पष्ट झालेले नसताना काँग्रेस पाठिंब्याविषयी विचार करू शकते, असाही मतप्रवाह आहे. मी राज्यसभेवर जाणार नाही, आत्ता सुरू असलेली टर्म माझी शेवटची निवडणूक असेल, असे शरद पवार यांनी या आधीच स्पष्ट केलेले असले तरी शरद पवार यांच्या राजकारणाच्या शैलीनुसार ऐनवेळी निवडणूक लढवायला देखील ते तयार होऊ शकतात, असे राजकीय जाणकारांना वाटते. त्यामुळे शरद पवार यांची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर महाविकास आघाडीतून कोण राज्यसभेवर जाणार, यासंबंधीची चर्चा होईल.
advertisement
शिवसेनेची भूमिका काय?
शरद पवार यांनी राज्यसभेवर जाणार नाही, अशी भूमिका जर घेतली तर आघाडीकडून कोणत्या पक्षाचा सदस्य राज्यसभेवर जाणार, याची चर्चा तिन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये होईल. आघाडीतील मोठा भाऊ म्हणून साहजिक उद्धव ठाकरे यांच्या सेनेला पहिल्यांदा संधी मिळू शकते. त्यानंतर प्रस्थापित नेत्यांपैकी एकाचे पुनर्वसन करायचे की नव्या चेहऱ्याला संधी द्यायची, याचा निर्णय ठाकरे घेतील.
advertisement
काँग्रेसची भूमिका काय?
दुसरीकडे राज्यसभेला उमेदवार न देता विधान परिषद निवडणुकीत उमेदवार देण्यासंबंधीचा काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा विचार आहे. आज मुंबईत वरिष्ठ काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. पुढच्या दोन दिवसांत हायकमांडशी चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ, अशी माहिती पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने दिली.
कोणत्या राज्यातून किती जागा रिक्त?
महाराष्ट्रातून ७ जागा, ओडिशातून ४ जागा, तामिळनाडूतून ६ जागा, पश्चिम बंगालमधून ५ जागा, आसाममधून ३, बिहारमधून ५, छत्तीसगडमधून २, हिमाचल प्रदेशमधून १, तेलंगणामधून २, हरियाणामधून २ जागा
advertisement
राज्यसभा निवडणुकीचे वेळापत्रक
सूचना जारी - २६ फेब्रुवारी २०२६
नामांकन अर्ज भरण्याची अंतिम तारीख - ५ मार्च २०२६
नामांकन अर्जांची छाननी - ६ मार्च २०२६
नामांकन अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख - ९ मार्च २०२६
मतदान - १६ मार्च २०२६ (सकाळी ९:०० ते दुपारी ४:००)
मतमोजणी - १६ मार्च २०२६, सायंकाळी ५:००
advertisement
निवडणुका पूर्ण करण्याची अंतिम तारीख - २० मार्च २०२६
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 18, 2026 4:26 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
महाविकास आघाडीकडून राज्यसभेवर कोण जाणार? अखेरच्या क्षणी शरद पवार डाव टाकणार? नव्या चेहऱ्याला संधी?








