मतदानाआधी ठाकरे गटाच्या उमेदवाराचा मृत्यू, निवडणूक आयोगाने उचललं महत्त्वाचं पाऊल
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
मनमाड नगर परिषदेच्या प्रभाग १० 'अ' मधील निवडणूक नितीन वाघमारे यांच्या मृत्यूनंतर राज्य निवडणूक आयोगाने स्थगित केली आहे, अध्यक्षपदाची निवडणूक मात्र सुरू राहील.
नाशिक जिल्ह्याच्या मनमाड नगर परिषदेच्या निवडणुकीबाबत राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने प्रभाग क्रमांक १० 'अ' मधील निवडणूक स्थगित केली आहे. या प्रभागातून निवडणूक लढणारे शिवसेना ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार नितीन वाघमारे यांचा सोमवारी (२४ नोव्हेंबर) रात्री मृत्यू झाला होता. मतदानाच्या आधीच उमेदवाराचा मृत्यू झाल्याने याठिकाणची निवडणूक थांबवावी, अशी याचिका निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आली होती. आता यावर निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला.
उमेदवाराचा मृत्यू झाल्याने त्या प्रभागातील एका जागेची किंवा संपूर्ण प्रभागाची निवडणूक प्रक्रिया थांबविण्यात यावी, अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती. त्याला उत्तर देताना राज्य निवडणूक आयोगाने संबंधित प्रभागांतील दोन्ही जागांकरिता निवडणूक प्रक्रिया थांबविण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, अध्यक्षपदाच्या या प्रभागातील निवडणूक प्रक्रिया नियोजित कार्यक्रमानुसार सुरू राहणार आहे.
निवडणुकीआधीच काळाचा घाला
मिळालेल्या माहितीनुसार, अवघ्या २४ वर्षांचे असलेले नितीन वाघमारे हे एक उत्साही आणि तरुण उमेदवार होते. त्यांनी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचाराला जोरदार सुरुवात केली होती. नागरिकांशी भेटीगाठी, पदयात्रा आणि सभांच्या माध्यमातून ते सक्रिय होते.
advertisement
मात्र, सोमवारी रात्री झोपेत असताना त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. निवडणुकीच्या प्रचाराचा अतोनात ताणतणाव त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरला असावा, अशी चर्चा आता शहरात सुरू आहे. मतदानाआधीच उमेदवाराचा मृत्यू झाल्यामुळे आता प्रभाग क्रमांक १० 'अ' मधील निवडणूक पुढे ढकलली जाणार का? असा महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित झाला होता. आता यावर निवडणूक आयोगानं मोठा निर्णय घेतला असून ही निवडणूक स्थगित केली.
view commentsLocation :
Nashik,Maharashtra
First Published :
November 28, 2025 8:38 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मतदानाआधी ठाकरे गटाच्या उमेदवाराचा मृत्यू, निवडणूक आयोगाने उचललं महत्त्वाचं पाऊल


