Maruti Swift झाली आऊटऑफ कंट्रोल, धडकली अन् इंजिन फुटलं, मुंबई-गोवा मार्गावर भीषण अपघात
- Published by:Sachin S
Last Updated:
मुंबई–गोवा महामार्गावर कशेडी बोगद्याजवळ दुपारच्या सुमारास ही घटना घडली. मारुती स्विफ्ट कार कोकणाच्या दिशेनं येत होती.
चंद्रकांत बनकर, प्रतिनिधी
खेड: शिमगोत्सव साजरा करण्यासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमाण्यांवर काळाने घाला घातल्याची दुर्दैवी घटना मुंबई–गोवा महामार्गावर घडली आहे. खेड तालुक्यातील कशेडी बोगदा परिसरात मारुती स्विफ्ट कारचा चालकावरील ताबा सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीला तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई–गोवा महामार्गावर कशेडी बोगद्याजवळ दुपारच्या सुमारास ही घटना घडली. मारुती स्विफ्ट कार कोकणाच्या दिशेनं येत होती. कशेडी बोगद्याजवळ कार पोहोचली असता अचानक चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं. त्यामुळे कार रस्त्याच्या कडेला जोरात आदळून अपघात झाला. या अपघातात वाहनातील दोघे जण गंभीर जखमी झाले. त्यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
advertisement
हा अपघात इतका भीषण होता की, कारच्या समोरील भागाचा चुराडा झाला आहे. स्विफ्ट कारचं इंजिन हे फुटलं आहे. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू केलं. तसंच स्वामी नरेंद्र महाराज संस्थान यांच्या रुग्णवाहिकेने तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना खेड येथील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. सध्या जखमीवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती देण्यात आली आहे.
advertisement
दरम्यान, शिमगोत्सवासाठी कोकणात मोठ्या प्रमाणावर चाकरमाण्यांची ये-जा सुरू असताना हा अपघात झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची नोंद पोलिसांकडून करण्यात आली असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
Location :
Khed,Ratnagiri,Maharashtra
First Published :
Mar 02, 2026 8:34 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maruti Swift झाली आऊटऑफ कंट्रोल, धडकली अन् इंजिन फुटलं, मुंबई-गोवा मार्गावर भीषण अपघात







