नाशिकचा पराभव जिव्हारी लागला! निवडणुकीनंतर राज ठाकरे अॅक्शन मोडवर, हा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Nashik Election 2026 : महापालिका निवडणुकीतील अपयशानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता संघटनात्मक पातळीवर जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.
नाशिक : महापालिका निवडणुकीतील अपयशानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता संघटनात्मक पातळीवर जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. पक्षाने थेट अॅक्शन मोडमध्ये जात आत्मपरीक्षण आणि नव्या रणनीतीची आखणी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिक येथील मध्यवर्ती कार्यालयात सर्व उमेदवार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली.
या बैठकीत निवडणुकीतील पराभवाची नेमकी कारणे, प्रचारातील त्रुटी, मतदारांपर्यंत पोहोचण्यात आलेल्या अडचणी तसेच भविष्यात कोणत्या पद्धतीने काम करावे, यावर सखोल चर्चा करण्यात आली. उमेदवारांनी आपले अनुभव, अडचणी आणि निरीक्षणे मोकळेपणाने मांडली. या बैठकीचा सविस्तर आढावा पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्याकडे पाठवण्यात येणार असून, लवकरच ते नाशिकमधील सर्व उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
advertisement
आत्मपरीक्षणातून नव्या सुरुवातीचा संदेश
यावेळी शहराध्यक्ष सुदाम कोंचडे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, निवडणुकीत विजय आणि पराभव हे राजकारणाचे अविभाज्य घटक आहेत. पराभवामुळे खचून न जाता नव्या आत्मविश्वासाने आणि जोमाने पक्षाचे काम पुढे नेणे गरजेचे आहे. त्यांनी कार्यकर्त्यांना संघटन मजबूत करण्यावर भर देण्याचे आवाहन केले.
प्रदेश उपाध्यक्ष सलीम मामा शेख आणि अॅड. रतनकुमार इचम यांनी बैठकीत सर्व उमेदवारांचे मनोगत ऐकून घेतले. प्रचारादरम्यान कोणत्या पातळीवर कमतरता राहिली, कुठे संघटनात्मक समन्वय कमी पडला, याबाबत त्यांनी सविस्तर चर्चा केली. या सर्व मुद्द्यांचा अहवाल तयार करून तो थेट राज ठाकरे यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे.
advertisement
फेरबदलांचे संकेत
मनपा निवडणुकीत मनसे आणि उद्धव ठाकरे गटाने मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर एकत्र येत निवडणूक लढवली होती. मनसेने ३० तर उद्धव सेनेने ७९ उमेदवार मैदानात उतरवले होते. मात्र निकाल अपेक्षेप्रमाणे लागले नाहीत. मनसेला केवळ एकच जागा मिळाली, तर उद्धव सेनेला १५ जागांवर विजय मिळवता आला. मराठी मतांचे एकत्रीकरण होऊनही मिळालेला हा निकाल ठाकरे बंधूंसाठी जिव्हारी लागणारा मानला जात आहे.
advertisement
या पराभवामुळे पक्षांतर्गत मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संघटनेतील काही पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीचा आढावा घेऊन जबाबदाऱ्यांमध्ये बदल केले जाऊ शकतात, असे संकेत बैठकीतून मिळाले आहेत. राज ठाकरे स्वतः उमेदवारांशी संवाद साधून पुढील दिशा आणि पक्षाची रणनीती निश्चित करणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
पुढील वाटचालीची तयारी
दरम्यान, या बैठकीमुळे पक्षात नव्या जोमाचे वातावरण निर्माण झाले असून, येत्या काळात मनसे अधिक आक्रमक आणि संघटित पद्धतीने मैदानात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 19, 2026 11:51 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नाशिकचा पराभव जिव्हारी लागला! निवडणुकीनंतर राज ठाकरे अॅक्शन मोडवर, हा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत










