वाहतूक कोंडीनं थांबला चिमुकल्याचा श्वास, मुंबईला येणारी अँब्युलन्स 5 तास अडकली, आईच्या कुशीत सोडला जीव
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडीत गॅलक्सी हॉस्पिटलमधील दीड वर्षांच्या चिमुकल्याचा रुग्णवाहिकेत मृत्यू, वेळेवर उपचार न मिळाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर.
अहमदाबाद महामार्गावर सोमवारी घडलेला एक हृदय पिळवटून टाकणारा प्रकार संपूर्ण परिसराला हादरवून गेला. दीड वर्षांचा चिमुकला पाच तास रुग्णवाहिकेत उपचार मिळवण्यासाठी तडफडत होता. मुंबईला उपचारासाठी नेता-नेता वाहतूक कोंडीनं त्याचा जीव घेतला. गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या या दीड वर्षांच्या चिमुकल्याला डॉक्टरांनी तातडीच्या उपचारांसाठी मुंबईत घेऊन जा असं सांगितलं. कुटुंबियांनी लगबग करुन रुग्णवाहिकेतून चिमुकल्याला घेऊन मुंबईच्या दिशेनं रवाना झाले, मात्र नशीबानं साथ दिली नाही.
मुंबई अहमदाबाद मार्गावर कायमच वाहतूक कोंडी होते. मात्र शुक्रवारी सकाळपासून जरा जास्तच होती. संध्याकाळी 20-25 किमीपर्यंत लांब गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. त्याच रुग्णवाहिका अडकली. एक दोन नाही तब्बल पाच तास रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकली. उपचार मिळावे यासाठी तडफडणारा दीड वर्षांच्या चिमुकल्याची अचानक हालचाल बंद झाली म्हणून कुटुंबीय घाबरले.
त्यांनी नाईलाजाने अखेर जवळच्या ससूनघर गावातील रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. सकाळपासूनच महामार्गावर वाहतूक कोंडी सुरू होती. संध्याकाळपर्यंत ती एवढी भीषण झाली की तब्बल 20 किमी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. शेकडो प्रवासी, कामगार आणि रुग्णवाहिका यात अडकून पडल्या. मात्र या वाहतूक कोंडीची किंमत चिमुकल्याच्या कुटुंबियांना मोजावी लागली.
advertisement
डॉक्टरांनी वेळेवर उपचार मिळाले असते तर बाळाचं आयुष्य वाचलं असतं, असा दावा केला आहे. पण रुग्णवाहिकेला मार्ग न मिळाल्याने मुंबईत पोहोचू शकले नाही आणि या चिमुकल्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. आईने एकच हंबरडा फोडला. महामार्गावरील सततची कोंडी, अपुऱ्या उपाययोजना आणि व्यवस्थापनातील त्रुटींमुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. ज्या रस्त्यावरून रोज लाखो प्रवासी प्रवास करतात, त्याच रस्त्यावर एका चिमुकल्याचं आयुष्य अडकून पडलं, ही शोकांतिका मनाला चटका लावून जाते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 19, 2025 1:25 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
वाहतूक कोंडीनं थांबला चिमुकल्याचा श्वास, मुंबईला येणारी अँब्युलन्स 5 तास अडकली, आईच्या कुशीत सोडला जीव