'तुझ्या पोटी मूल नको', पोटात लाथा घालून गर्भपात केला, मुंबईत पोलिसाची पत्नीसोबत क्रूरता
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
मुंबईच्या काळाचौकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. इथं एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या गर्भवती पत्नीच्या पोटात लाथा घालून तिचा गर्भपात केला आहे.
मुंबईच्या काळाचौकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. इथं एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या गर्भवती पत्नीच्या पोटात लाथा घालून तिचा गर्भपात केला आहे. यात आरोपी पोलिसाच्या आईनं देखील साथ दिली असून तिनेही मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मारहाण करणारा पती मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल असून तो लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. या प्रकरणी या पोलीस कॉन्स्टेबलच्या पत्नीने काळाचौकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, पीडित महिला आणि या कॉन्स्टेबलचे लग्न फेब्रुवारी २०२४ मध्ये झाले होते. दोघांचाही हा दुसरा विवाह होता.
लग्नानंतर काही काळाने ही महिला गरोदर झाली. तिने आपण एक महिन्याची गर्भवती असल्याचे पती आणि सासूला सांगितले. मात्र, याच वेळी हुंड्याच्या मागणीवरून घरात वाद सुरू झाला. पीडितेने तक्रारीत म्हटलं की, "तुझ्या पोटी मूल नको आणि घराचा वारस जन्माला येऊ नको देऊ," असे म्हणत पती आणि सासूने क्रूरपणे माझ्या पोटावर लाथा मारल्या. या अमानुष मारहाणीमुळे तिला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आणि तिचा गर्भपात झाला.
advertisement
पतीसह सासूवर गुन्हा दाखल
पीडित महिलेने तातडीने काळाचौकी पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी महिलेची तक्रार गांभीर्याने घेत पोलीस कॉन्स्टेबल पती आणि सासूविरुद्ध हुंड्यासाठी छळ आणि गर्भपाताला कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस दलातील कर्मचाऱ्यानेच आपल्या पत्नीला गरोदरपणात अशा प्रकारे अमानुष मारहाण करून गर्भपात घडवून आणल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे. काळाचौकी पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 09, 2025 11:44 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'तुझ्या पोटी मूल नको', पोटात लाथा घालून गर्भपात केला, मुंबईत पोलिसाची पत्नीसोबत क्रूरता


