Nagpur: चिमुकल्यांचा जीव धोक्यात, काचा फुटल्या, दरवाजा निखळला, 2 स्कूल बसचा भीषण अपघात, 8 जखमी
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
मानकापूर उड्डाणपुलावर स्कूल बस आणि व्हॅनच्या अपघातात आठ विद्यार्थी जखमी, एक विद्यार्थिनी व्हेंटिलेटरवर, नागरिकांचा रास्ता रोको, प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप.
नागपूर, प्रतिनिधी उदय तिमांडे: मानकापूर परिसरात आज सकाळी एक भीषण अपघात झाला. मानकापूर उड्डाणपुलावर एक स्कूल बस आणि स्कूल व्हॅनची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात आठ विद्यार्थी जखमी झाले असून, त्यापैकी तीन विद्यार्थ्यांना फ्रॅक्चर झालं. तर एका विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर असून, तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं.
या अपघातात पाच विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. बसच्या चालकासह एकूण आठ जण जखमी झाले. अपघातानंतर तात्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आले. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नागरिकांमध्ये संतापाची लाट
या अपघातानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी मानकापूर उड्डाणपुलावर आंदोलन सुरू करत रास्ता रोको केला. मागील सहा महिन्यांपासून उड्डाणपुलाच्या एका बाजूचे काम सुरू असल्यामुळे वाहतूक एकाच बाजूने सुरू आहे. त्यात व्हॅन चालक बेजबाबदारपणे वाहन चालवत असल्याचं अनेकवेळा समोर आलं आहे. याबाबत वारंवार लोकांनी त्याला सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र व्हॅन चालकाने ऐकलं नाही.
advertisement
या अपघाताला व्हॅन चालकाचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप करत नागरिकांनी केला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. आंदोलनकर्त्यांना शांत करून वाहतूक पूर्ववत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या घटनेमुळे परिसरातील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती.
मानकापूर उड्डाणपुलाचे काम अनेक महिन्यांपासून सुरू आहे, कामाचा वेग अत्यंत कमी असल्यामुळे आणि पर्यायी वाहतुकीची योग्य व्यवस्था नसल्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेक वेळा या पुलावरून ये-जा करताना धोकादायक परिस्थिती निर्माण होते. या अपघातामुळे प्रशासनाला नागरिकांनी दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करणे किती धोकादायक ठरू शकते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. प्रशासनाने तातडीने या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी जोर धरत आहे.
advertisement
गंभीर जखमी मुलीचे आजोबा काय म्हणाले?
मुलीची तब्येत अत्यंत सिरीयस आहे, तिला होश नाही डॉक्टरांनी नातेवाईकांना भेटण्याचा सल्ला दिला आहे, 9 व्या वर्गात शिकते अभ्यासात हुशार आहे, 90 - 95 टक्के मार्क घेत असते, माझे दोन्ही नातू भवन्समध्ये असून अपघाताच्या वेळी दोघेपण व्हॅनमध्ये होते, मी ड्रायव्हरला अनेकदा सांगितलं मूलं तक्रार करतात व्हॅन हळू चालवत जा पण तो ऐकत नव्हता, मुलीचे वडील नोकरीच्या निमित्ताने पुण्यात राहतात आठवड्यातून एकदा नागपूर येतात, आम्हाला अपघाताची माहिती मिळाली तर धक्का बसला आहे, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रकाश माटे गंभीर जखमी मुलीच्या आजोबांनी दिली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 12, 2025 12:39 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nagpur: चिमुकल्यांचा जीव धोक्यात, काचा फुटल्या, दरवाजा निखळला, 2 स्कूल बसचा भीषण अपघात, 8 जखमी