Lok Sabha Elections : नाशिकमध्ये घडामोडींना वेग, हेमंत गोडसे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईला रवाना
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
नाशिकच्या जागेचा तिढा अद्यापही कायम आहे. या लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून कोणाला उमेदवारी मिळणार? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
नाशिक, लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. महायुतीकडून अनेक लोकसभा मतदारसंघात उमेदवारांच्या नावाची घोषणा देखील करण्यात आली आहे. मात्र अजूनही काही जागांचा तिढा कायम आहे. त्यामुळे अद्याप तिथे उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाहीये. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, नाशिक, सातारा या मतदारसंघाचा समावेश आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना तिकीट मिळणार असल्याची चर्चा आहे. मात्र दुसरीकडे ही जागा शिवसेनेचीच आहे, असा दावा हेमंत गोडसे यांनी केला आहे. त्यामुळे या जागेचा तिढा अजूनही सुटू शकलेला नाहीये.
या सर्व पार्श्वभूमीवर नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे हेमंत गोडसे हे आज पुन्हा एकदा मुंबईकडे रवाना झाले आहेत. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान नाशिकच्या जागेवर चर्चा होण्याची शक्यता आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून संभाव्य उमेदवार म्हणून छगन भुजबळ यांचं नाव देखील चर्चेत आहे. त्यामुळे नाशिकमधून उमेदवारी कोणाला मिळणार, भुजबळ की हेमंत गोडसे? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
advertisement
दरम्यान दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे नेते बबन घोलप हे देखील मुंबईला रवाना झाले आहेत. ते आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 'नार्वेकर कोण आहेत? त्यांचं ऐकून मला पक्षातून बाहेर काढलं. नार्वेकर यांच्यामुळे अनेकजण पक्ष सोडून गेले. मी शिर्डी लोकसभा मतदारसंघात पक्ष वाढवला. मात्र अचानक मिलिंद नार्वेकर यांचं ऐकूण मला काढण्यात आलं. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वसा आणि वारसा घेऊन एकनाथ शिंदे पुढे जात आहेत. यापुढे मी त्यांच्यासोबत काम करणार असल्याचं' घोलप यांनी म्हटलं आहे.
Location :
Nashik,Nashik,Maharashtra
First Published :
April 06, 2024 2:23 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Lok Sabha Elections : नाशिकमध्ये घडामोडींना वेग, हेमंत गोडसे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईला रवाना


