महाराष्ट्रासाठी 8 गोल्ड मेडल, राष्ट्रीय खेळाडूचा रेल्वे अपघातात दुर्दैवी अंत, जेवण आणण्यासाठी गेला अन्...
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथील रहिवासी असणारा राष्ट्रीय तिरंदाज अर्जुन सोनवणे याचा रेल्वे स्थानकावर दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
नाशिक: क्रीडा विश्वाला हादरवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथील रहिवासी असणारा राष्ट्रीय तिरंदाज अर्जुन सोनवणे याचा राजस्थानच्या कोटा रेल्वे स्थानकावर दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अर्जुन हा आपल्या सहकाऱ्यांसोबत भटिंडा येथे एका स्पर्धेसाठी गेला होता. स्पर्धा झाल्यानंतर परत येत असताना झालेल्या रेल्वे अपघातात त्याचा मृत्यू झाला. तो शकुरबस्ती-मुंबई सेंट्रल एसी स्पेशल ट्रेनने घरी परतत होता.
नेमकं काय घडलं?
शनिवारी (१ नोव्हेंबर) रात्री साडेआठच्या सुमारास ट्रेन कोटा जंक्शनवर थांबली होती. याच वेळी, जेवणाचे पाकीट घेण्यासाठी अर्जुन चालत्या ट्रेनमधून घाईघाईत उतरण्याचा प्रयत्न करत होता. हा प्रयत्न त्याच्या जीवावर बेतला. चालत्या ट्रेनमधून उतरण्याच्या गडबडीत तो प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या मधल्या जागेत अडकला. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली.
अपघात घडताच त्याचे सहकारी घाबरले आणि त्यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. अर्जुनला तातडीने उपचारासाठी एमबीएस रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या अपघाताने त्याच्या सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला.
advertisement
आठ सुवर्णपदके नावावर
केवळ २० वर्षांचा असलेला अर्जुन सोनवणे हा एक उदयोन्मुख तिरंदाज होता. गेल्या पाच वर्षांपासून तो नियमितपणे तिरंदाजीचा सराव करत होता. पदवीचे शिक्षण घेत असलेल्या या युवा खेळाडूने आपल्या कारकिर्दीत आठ वेळा राष्ट्रीय पातळीवर स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. विशेष म्हणजे, राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्याने आठ सुवर्णपदके जिंकून आपल्या नावाचा डंका वाजवला होता.
advertisement
अर्जुच्या निधनाची माहिती समोर येताच कुटुंबावर आणि खेडगाव परिसरात दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनेनंतर रविवारी अर्जुनचे मामा आणि मावशीचा मुलगा कोटा येथे पोहोचले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि शवविच्छेदनानंतर अर्जुनचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. एका कर्तृत्ववान खेळाडूचा अशा दुर्दैवी अपघातात अंत झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
view commentsLocation :
Kota,Kota,Rajasthan
First Published :
November 03, 2025 8:05 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
महाराष्ट्रासाठी 8 गोल्ड मेडल, राष्ट्रीय खेळाडूचा रेल्वे अपघातात दुर्दैवी अंत, जेवण आणण्यासाठी गेला अन्...


