Navi Mumbai : निकालानंतरही नाईक-शिंदेंच्या कार्यकर्त्यांचा राडा, नवी मुंबईमध्ये शिवसेनेच्या कार्यालयाची तोडफोड
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
नवी मुंबई महापालिका निवडणूक निकालानंतरही भाजप-शिवसेना यांच्यातील वाद कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत.
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका निवडणूक निकालानंतरही भाजप-शिवसेना यांच्यातील वाद कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. भाजपकडून शिवसेनेच्या कार्यलायाची तोडफोड करण्यात आल्याचा आरोप होत आहे. नेरुळ येथील शिवसेना कार्यालय फोडलं गेलं आहे. शिवसेना शहरप्रमुख विजय माने यांचं कार्यालय भाजप कार्यकर्त्यांकडून फोडण्यात आल्याचा आरोप होत आहे.
नवी मुंबईमध्ये भाजपची सत्ता स्थापन व्हायचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजप 65 जागांवर विजयी झाली आहे तर शिवसेना 42, उद्धव ठाकरेंची शिवसेना 2, मनसे 1 आणि एक अपक्ष निवडून आला आहे. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती झाली नाही. वनमंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेली शाब्दिक चकमक महाराष्ट्राने पाहिली. भाजपनं परवानगी दिल्यास एकनाथ शिंदेंचा टांगा पलटी घोडे फरार करणार, असा उघड इशारा गणेश नाईक यांनी दिला होता.
advertisement
शिंदेंनी माझ्या नादी लागू नये, हलक्यात घेऊ नका... शिंदेंनी स्वत:च्या गळ्याला फास लावून घेतला आहे. स्वत:च्या हिमतीवर निवडणूक लढवून दाखवा, असं आव्हानही गणेश नाईक यांनी शिंदेना दिलं होतं.
विजयानंतर काय म्हणाले गणेश नाईक?
निवडणूक पार पडल्यानंतर आता वाद-विवादांना पूर्णविराम देणार आहे. आता कोणत्याही प्रकारचे आरोप-प्रत्यारोप होणार नाहीत. माझ्या कार्यकर्त्यांनीही संयम बाळगावा, असं आवाहन गणेश नाईक यांनी केलं आहे. नवी मुंबई परिसरातील अनधिकृत टोलेजंग इमारतींचं बांधकाम तात्काळ बंद करण्यात यावं. तसंच शहरातील मैदाने बिल्डरच्या घशात घालू नयेत, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. तसंच नवी मुंबईतील सिग्नलवर होणारी वाहतूक कोंडी, भिकाऱ्यांचा प्रश्न यासह शहरातील अनेक प्रलंबित समस्या लवकरात लवकर सोडवल्या जातील, असं आश्वासनही गणेश नाईक यांनी दिलं आहे.
advertisement
निवडून आलेल्या 65 नगरसेवकांना योग्य ते प्रशिक्षण दिलं जाईल. शेर या लौकिकाला साजेसं विकासकाम करण्यात येईल. 2030 पर्यंत वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईच्या समस्येवरही ठोस उपाययोजना राबवण्यात येतील, असं गणेश नाईक म्हणाले आहेत.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Navi Mumbai,Thane,Maharashtra
First Published :
Jan 16, 2026 8:12 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Navi Mumbai : निकालानंतरही नाईक-शिंदेंच्या कार्यकर्त्यांचा राडा, नवी मुंबईमध्ये शिवसेनेच्या कार्यालयाची तोडफोड







