Nitesh Rane: नितेश राणेंच्या बंगल्यावरच्या बेवारस बॅगेचे अमेरिकन कनेक्शन, पोलीस तपासात काय सापडलं?
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Nitesh Rane: पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एका ४० वर्षीय अमेरिकन नागरिकाने ही बॅग तिथे ठेवल्याचे स्पष्ट झाले.
मुंबई: सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच, रविवारी सकाळी दक्षिण मुंबईतील मरिन ड्राइव्ह परिसरात एका घटनेने पोलिसांची चांगलीच धावपळ उडवून दिली. राज्याचे मंत्री नितेश राणे यांच्या 'ओम साद' या शासकीय निवासस्थानाबाहेर एक संशयास्पद बेवारस बॅग आढळल्याने परिसरात बॉम्ब असल्याची भीती पसरली होती. मात्र, तपासानंतर जे सत्य समोर आले, ते पाहून सुरक्षा यंत्रणांनी चक्क कपाळावर हात मारून घेतला.
advertisement
पोलीस आणि श्वानपथकाची धावपळ
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात सध्या हाय-अलर्ट असतानाच मंत्र्यांच्या घराबाहेर बॅग दिसल्याने मरिन ड्राइव्ह पोलीस तात्काळ सतर्क झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) आणि श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. काही काळ हा परिसर वेढण्यात आला होता. तर, चौकशीची चक्रे फिरवण्यात आली. बॅगेत स्फोटके असावीत या शंकेने सर्वांचा जीव टांगणीला लागला होता.
advertisement
बॅगेत स्फोटके नव्हे, तर 'गिफ्ट'!
कडक बंदोबस्तात जेव्हा ती बॅग उघडण्यात आली, तेव्हा पोलिसांना त्यात बॉम्बऐवजी कपडे आणि बूट आढळले. विशेष म्हणजे, बॅगेत एक चिठ्ठीही सापडली. या चिठ्ठीवर "ही बॅग आणि त्यातील सर्व वस्तू मोफत आहेत. ज्याला हवे असेल त्याने ते घेऊन जावे." असा मजकूर होता. ही चिठ्ठी वाचून तणावाखाली असलेल्या पोलीस पथकालाही आश्चर्याचा धक्का बसला.
advertisement
सीसीटीव्हीतून उलगडा, एका अमेरिकन पर्यटकाने ठेवली होती बॅग
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एका ४० वर्षीय अमेरिकन नागरिकाने ही बॅग तिथे ठेवल्याचे स्पष्ट झाले. हा पर्यटक मरिन ड्राइव्हवरील 'सी ग्रीन' हॉटेलमध्ये वास्तव्यास होता. मुंबईहून गोव्याला जाण्यापूर्वी आपल्याकडील जास्तीचे सामान ओझे नको म्हणून त्याने ते मंत्र्यांच्या बंगल्याबाहेर 'दान' म्हणून सोडून दिले आणि तो निघून गेला.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 12, 2026 8:32 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nitesh Rane: नितेश राणेंच्या बंगल्यावरच्या बेवारस बॅगेचे अमेरिकन कनेक्शन, पोलीस तपासात काय सापडलं?







