30 मिनिटांच्या सभेसाठी 3 कोटी खर्च करतात, तेव्हा कुणी... इंदुरीकरांच्या संतापाचा नवा Video
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Indurikar Maharaj New Video: नेटकऱ्यांच्या टीकेने संतप्त झालेल्या इंदुरीकर महाराजांचा नवा व्हिडीओ समोर आला आहे.
हरीश दिमोटे, प्रतिनिधी, अहिल्यानगर : लग्न साधी करा, असा उपदेश कीर्तनातून देणारे परंतु स्वत:ची वेळ आल्यावर मात्र मुलीच्या साखरपुड्यात लाखो रुपयाची उधळपट्टी करणारे निवृत्ती महाराज इंदुरीकर चर्चेत आले आहेत. गेल्या आठवड्यापासून नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. उपदेश देणे सोपे असते परंतु अमलात आणणे कठीण असते, असे सांगत नेटकऱ्यांनी महाराजांच्या दुटप्पी भूमिकेवर सडकून टीका केली. नेटकऱ्यांच्या टीकेने संतप्त झालेल्या इंदुरीकर महाराजांचा नवा व्हिडीओ समोर आला आहे. साखरपुड्यापेक्षा मुलीच्या लग्नाचा बार मोठ्या धुमधडाक्यात उडवणार असल्याचे ते म्हणाले.
आपल्या नर्मविनोदी शैलीतून समाजाला भेडसावणाऱ्या अनेक प्रश्नांवर भाष्य करून प्रबोधन करणारे प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या मुलीच्या साखपुड्याच्या खर्चावरून ते चर्चेत आले आहेत. संगमनेरमध्ये पार पडलेल्या सोहळ्याच्या चित्रफिती समाज माध्यमांवर जोरदार पसरल्या. लग्नातल्या मुलींच्या पेहरावावरून, त्यांच्या दिसण्यावरून, लग्नात होणाऱ्या खर्चावरून इंदुरीकर महाराजांनी पालक वर्गाला झोडपून काढले होते. मात्र स्वत:च्या मुलीच्या लग्नात आपल्या उपदेशाच्याविरुद्ध जाऊन कार्य केल्याने नेटकरी भडकले आहेत. टीकाकारांना इंदुरीकर महाराजांनी एका कीर्तनातून उत्तर दिले आहे.
advertisement
त्या औलादींना सांगतो...
अनेक जण माझ्या मुळावर उठणार, हे मला माहिती होते. त्यांन औलादींना मी सांगतो. मुलीचं लग्न याच्यापेक्षा टोलेजंग करणार आहे. तीस मिनिटांच्या सभेसाठी राजकारणी तीन कोटी खर्च करतात. तेव्हा कुणी काही बोलत नाही. ते पैसे कुठून आणले हे देखील माध्यम प्रतिनिधी त्यांना विचारीत नाही, अशा शब्दात इंदुरीकर महाराज यांनी आपला संताप व्यक्त केला. तसेच निवडणूक काळात आता पैशाचा तमाशा सुरूच होईल, असे म्हणत त्यांनी राजकारण्यांवरही निशाणा साधला.
advertisement
दुसऱ्याला त्रास देण्यालाही मर्यादा असतात
हे लोक विकले गेलेले आहेत. केवळ दुसऱ्यांना त्रास देणे हेच यांचे काम राहिले आहे. दुसऱ्याला त्रास देण्यालाही मर्यादा असतात. माझ्यापर्यंत ठीक होते परंतु लोक माझ्या कुटुंबावर बोलत आहेत. माझ्या मुलीच्या अंगावरील ड्रेसपर्यंत काही लोक गेले आहेत. आता डोक्यावरचा फेटा खाली ठेवायची वेळ आली आहे, असे ते म्हणाले.
advertisement
मुलीच्या साखरपुड्यात लाखो रुपये खर्च केल्याने इंदुरीकर लोकांच्या टार्गेटवर
मुलांची लग्न, साखरपुडे साध्या पद्धतीने करा. कर्ज काढू नका, असा आग्रह इंदुरीकर महाराज कीर्तनातून धरतात. लग्न सोहळ्यात वाढत चाललेल्या खर्चावरून त्यांनी अनेक वेळा कोरडे ओढले. परंतु बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, या उक्तीप्रमाणे जर निवृत्ती महाराज इंदुरीकर वागले असते तर त्यांनी मुलीचा अतिशय साध्या पद्धतीने साखरपुडा करून समाजापुढे आदर्श निर्माण केला असता. मात्र उपदेशाप्रमाणे न वागता मुलीच्या साखरपुड्यात लाखो रुपये खर्च केल्याने इंदुरीकर लोकांच्या टार्गेटवर आले आहेत.
view commentsLocation :
Sangamner,Ahmadnagar,Maharashtra
First Published :
November 15, 2025 7:05 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
30 मिनिटांच्या सभेसाठी 3 कोटी खर्च करतात, तेव्हा कुणी... इंदुरीकरांच्या संतापाचा नवा Video


