अजितदादा गेले, शरद पवारांची स्मारक उभारण्याची इच्छा, कुठे होणार?
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Grand Memorial for Late Deputy CM Ajit Pawar in Baramati: महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. बारामतीत त्यांचे एक भव्य स्मारक उभारलं जाणार आहे.
Grand Memorial for Late Deputy CM Ajit Pawar in Baramati: महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. आपल्या लाडक्या नेत्याच्या आठवणी चिरंतन जपण्यासाठी आता बारामतीत त्यांचे एक भव्य स्मारक उभारलं जाणार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्वतः ही इच्छा व्यक्त केली असून, बारामतीतील विद्या प्रतिष्ठान संकुलात या स्मारकासाठी जागा निश्चितीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
अंत्यसंस्काराच्या ठिकाणी पवारांची भेट
अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतरच्या पाचव्या दिवशी, रविवारी (ता. १) ज्येष्ठ नेते शरद पवार मुंबईकडे रवाना झाले. मुंबईला जाण्यापूर्वी त्यांनी बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर भेट दिली. याच ठिकाणी अजित पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. शरद पवार यांच्यासोबत त्यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार यादेखील उपस्थित होत्या.
advertisement
विद्या प्रतिष्ठानमध्येच स्मारक का?
अजित पवार यांचे विद्या प्रतिष्ठानशी अत्यंत जवळचे नाते होते. या संस्थेच्या वाढीमध्ये त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यामुळेच, शरद पवार यांनी विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त किरण गुजर यांच्याशी संवाद साधताना स्मारकाबाबतची संकल्पना मांडली. गुजर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, "अजितदादांचे स्मारक विद्या प्रतिष्ठान संकुलात व्हावे, अशी शरद पवार यांची इच्छा आहे. त्यानुसार जागा पाहण्याचे आणि निश्चितीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे."
advertisement
स्मारकाचे स्वरूप कसे असेल?
स्मारक नेमके कशा प्रकारचे असेल, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र स्मारकाच्या आराखड्याचे विविध नमुने तयार केले जातील. विद्या प्रतिष्ठानच्या सर्व विश्वस्तांशी सविस्तर चर्चा केली जाईल. अजितदादांच्या व्यक्तीमत्वाला आणि कार्याला साजेसं स्मारक उभारलं जाईल.
Location :
Baramati,Pune,Maharashtra
First Published :
Feb 02, 2026 9:33 AM IST










