भाजप-राष्ट्रवादीतला वाद शिगेला, रवींद्र चव्हाण-अजित पवारांमध्ये जुंपली, चंद्रकांतदादांची उडी
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
रवींद्र चव्हाण आणि अजित पवार हे राज्यात सत्तेत एकत्र आहेत. पण पालिका निवडणुकीत ते एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत.
मुंबई : सत्तेत एकत्र बसलेल्या भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सध्या जोरदार घमासान सुरु आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि अजित पवारांमध्ये थेट जुंपलीय. दोघेही एकमेकांचा भ्रष्टाचार काढताहेत. दोन्ही नेते एकमेकांना युती धर्म पाळण्याची आठवण करून देत आहेत... त्यामुळे पुणेकर बुचकळ्यात पडलेत
रवींद्र चव्हाण आणि अजित पवार हे राज्यात सत्तेत एकत्र आहेत. पण पालिका निवडणुकीत ते एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमधील भाजपच्या कारभारावरून सडकून टीका केली होती. भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, भाजपच्या सत्ता काळात त्यांनी प्रत्येक गोष्टीत पैसे खाल्लेत, असे अजित पवार म्हणाले. तर 'अपने गिरेबान में झांको, बोललो तर अडचण होईल', असे प्रत्युत्तर चव्हाण यांनी दिले.
advertisement
अजित पवारांची ती बोचरी टीका भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागली. आणि तिथूनचं अजित पवार आणि भाजप नेत्यांमध्ये शाब्दीक युद्धाला तोंड फुटलं. भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही अजित पवार यांना प्रत्युत्तर दिले. मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीही आमच्याकडे आहे. दमात घेऊ नका, हलक्यात पण घेऊ नका दम देणाऱ्यांनी विचार करून काम करावं, असे चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.
advertisement
अजित पवारांनी सत्तार हजार कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून मित्र पक्ष भाजपची कोंडी केली होती. माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांसोबत मी सत्तेत बसलोय, असे म्हणून अजित पवार यांनी भाजपचीच कोंडी केली.
एकीकडं अजित पवार विरुद्ध रवींद्र चव्हाण तर दुसरीकडं अजित पवार विरुद्ध मुरलीधर मोहळ यांच्यात गुन्हेगारांना उमेदवारीच्या मुद्यावरून वाकयुद्ध रंगलं होतं. पुण्यातील गुन्हेगारी संपवायला निघालेले अजित पवार गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात सोनाली आणि लक्ष्मी आंदेकरांना तिकीटे देतात, असे म्हणत मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवार यांना डिवचले तर 'पुण्यातून एका व्यक्तीला परदेशात जायला कुणी मदत केली?, असा पलटवार करून अजित पवार यांनी भाजपला अडचणीत आणले.
advertisement
दरम्यान अजित पवार विरुद्ध भाजप नेत्यांनमध्ये रंगलेल्या वादात माजी खासदार नवनीत राणांनी उडी घेतली. आणि पुण्यातील हा वाद थेट अमरावतीत जावून पोहोचला. बोलताना कुणीही मर्यादा सोडू नये, असा इशारा त्यांनी अजित पवार यांना दिला.
पुणे जिल्हा हा पवार घराण्याचा बालेकिल्ला राहिलाय. आतापर्यंत पवारांचं राजकारण पुणे जिल्ह्याभोवती प्रामुख्यानं फिरलंय. भाजपनं पवारांच्या अनेक शिलेदारांना आपल्या पक्षात घेऊन आपली ताकद वाढवलीय. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपकडे असलेली सत्ता पुन्हा काबिज करण्यासाठी अजित पवारांनी कंबर कसलीय आणि त्यातून दोन्ही पक्षांमध्ये खणाखणी सुरू झालीय. यातूनच महायुतीच्या या दोन पक्षांमध्ये जुंपल्याच दिसून आलंय.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 05, 2026 10:00 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भाजप-राष्ट्रवादीतला वाद शिगेला, रवींद्र चव्हाण-अजित पवारांमध्ये जुंपली, चंद्रकांतदादांची उडी










