Rahul Narwekar : विधानसभा अध्यक्षांचा आव्हाड, पडळकरांना धक्का, राडा प्रकरणात नार्वेकरांचा कठोर पवित्रा
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Rahul Narwekar Jitendra Awhad Gopichand Padalkar : सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. त्यानंतर आज विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कारवाईची मोठी घोषणा केली.
मुंबई: राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये गुरुवारी विधान भवनाच्या लॉबीत तुंबळ हाणामारी झाली. आमदार आणि मंत्री ज्या प्रवेशद्वारातून विधान भवनात प्रवेश करतात त्याच द्वारासमोर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. त्यानंतर आज विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कारवाईची मोठी घोषणा केली.
गुरुवारी विधिमंडळात झालेल्या राड्याचे पडसाद आज सकाळी विधानसभेच्या कामकाजात उमटले. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास प्रस्ताव सादर करणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या सगळ्या प्रकरणाची सुनावणी केली आणि कारवाईचे आदेश दिले.
विधानभवनाच्या लॉबीमध्ये काल घडलेली आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपिचंद पडळकर यांच्यातील कार्यकर्त्यांची जोरदार धक्काबुक्की आणि हाणामारीच्या घटनेने संपूर्ण विधानभवनात खळबळ उडवून दिली होती. या घटनेमुळे विधानभवनातील सुरक्षा व्यवस्था आणि शिस्तीवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं.
advertisement
घटनेची गंभीर दखल घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तातडीने मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला. अहवाल प्राप्त झाल्यानंतर अध्यक्ष नार्वेकर यांनी या प्रकरणी कठोर निर्णय घेत कारवाईचे आदेश दिले आहेत.
advertisement
या निर्णयानुसार, आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते सर्जेराव टकले यांचं वर्तन सभागृहाच्या प्रतिष्ठेला बाधा आणणारे ठरल्याचे अध्यक्षांनी नमूद केलं.
विधानसभा अध्यक्ष नार्वेकर म्हणाले, "दोन्ही अभ्यंगतांचे वर्तन हे सभागृहाचा अवमान आणि विशेषाधिकार भंग करण्यासारखं आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी आणि योग्य ती कारवाई व्हावी म्हणून मी हे प्रकरण विधानसभा विशेषाधिकार समितीकडे सुपूर्द करत असल्याची घोषणा नार्वेकर यांनी केली. गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांना दिलगिरी व्यक्त करण्याचे निर्देश अध्यक्षांनी दिले. विधानसभा अध्यक्षांनी या राडा प्रकरणी दोन्ही आमदारांची जबाबदारी असल्याचे संकेत दिले.
advertisement
विधानसभा अध्यक्षांची मोठी घोषणा...
विधिमंडळाच्या पायऱ्यांवर झालेल्या राड्यानंतर आता विधानभवन परिसरात यापुढे इतर कोणालाही प्रवेश नसणार, याची घोषणा विधानसभा अध्यक्षांनी केली. यापुढे मंत्री, आमदार शासकीय कर्मचारी वगळता कोणालाही प्रवेश नसणार. त्याशिवाय, मंत्र्यांना त्यांच्या खात्याशी संबंधित प्रश्नांची चर्चा, त्यांची सोडवणूक करण्यासाठी मंत्रालयातील दालनाचा वापर करावा, अशी सूचना विधानसभा अध्यक्षांनी केली.
राड्यानंतर आता संसदेप्रमाणे विधिमंडळातही नीतीमूल्य समिती स्थापन करणार असल्याची घोषणा नार्वेकर यांनी केली. आमदारांचे आचरण हे आदर्शवत असावे, असेही त्यांनी म्हटले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 18, 2025 3:05 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Rahul Narwekar : विधानसभा अध्यक्षांचा आव्हाड, पडळकरांना धक्का, राडा प्रकरणात नार्वेकरांचा कठोर पवित्रा