Raj Thackeray : 'आमच्यावर तुटून पडणारे कुठं लपून बसलेत?', मीरा-भाईंदर दौऱ्याआधी राज ठाकरेंचे ट्वीट चर्चेत
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Raj Thackeray : मोर्चा काढण्यास पोलिसांनी अटकाव केला होता. त्यावेळी पोलिसांकडून हा मोर्चा दडपण्याचे प्रयत्न झाले. पण, मराठी संघटनांचे आंदोलन झाले. त्यानंतर आज राज ठाकरे मीरा-भाईंदरच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्या आधी राज ठाकरे यांनी ट्वीट केले आहे.
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज मीरा-भाईंदरच्या दौऱ्यावर असणार आहे. आज संध्याकाळी राज ठाकरे हे मीरा रोड येथील सभेला संबोधित करणार आहेत. काही दिवसांपूर्वीच मनसे आणि इतर मराठी संघटनांना मोर्चा काढण्यास पोलिसांनी अटकाव केला होता. त्यावेळी पोलिसांकडून हा मोर्चा दडपण्याचे प्रयत्न झाले. पण, मराठी संघटनांचे आंदोलन झाले. त्यानंतर आज राज ठाकरे मीरा-भाईंदरच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्या आधी राज ठाकरे यांनी ट्वीट केले आहे.
आजच्या सभेत राज ठाकरे काय भाषण करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मागील काही दिवसांत मराठी भाषा, मराठी माणसांबाबत अपमानास्पद भाष्य करणाऱ्या परप्रांतीय लोकांना मनसैनिकांनी मारहाण केल्याचे व्हिडीओ समोर आले होते. त्यानंतर आता दौऱ्याआधीच राज ठाकरेंचे ट्वीट चर्चेत आले आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या ट्वीटमध्ये गुरुवारी, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर झालेल्या राड्यावर आपला संताप व्यक्त केला. सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधी पक्षातील आमदार यांच्या कार्यकर्त्यांच्यात तुफान हाणामारी झाल्याची चित्रफीत पाहिली. ही चित्रफीत पाहून मला खरंच प्रश्न पडला, ' काय अवस्था झालीये आपल्या महाराष्ट्राची ?' असा सवाल त्यांनी केला. मराठी भाषेसाठी, मराठी माणसाच्या अपमानासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हात उचलला तर त्याच्यावर, आमच्या पक्षावर तुटून पडणारे आता कुठे लपून बसलेत? असा प्रश्नही राज यांनी उपस्थित केला.
advertisement
राज ठाकरेंनी काय म्हटले?
काल विधानभवन परिसरात सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधी पक्षातील आमदार यांच्या कार्यकर्त्यांच्यात तुफान हाणामारी झाल्याची चित्रफीत पाहिली. ही चित्रफीत पाहून मला खरंच प्रश्न पडला, ' काय अवस्था झालीये आपल्या महाराष्ट्राची ?'
सत्ता हे साधन असावं साध्य नाही याचा विसर पडल्यामुळे वाट्टेल त्या लोकांना पक्षात घ्यायचं, त्या लोकांचा वापर इतर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांवर गलिच्छ शेरेबाजी करण्यासाठी करायचा आणि पुन्हा राजकीय साधनशुचितेच्या गोष्टी बोलायच्या हा भंपकपणा आता तरी महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आला असेल असं मी मानतो. मी तर मराठी जनतेलाच विचारेन, 'कोणाच्या हातात दिला आहेत महाराष्ट्र?'
advertisement
मराठी भाषेसाठी, मराठी माणसाच्या अपमानासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हात उचलला तर त्याच्यावर, आमच्या पक्षावर तुटून पडणारे आता कुठे लपून बसलेत? जेंव्हा मराठी भाषेला किंवा मराठी माणसाच्या गळ्याला कोणी नख लावायचा प्रयत्न केला तर माझा महाराष्ट्र सैनिक त्या व्यक्तीला दणका देतो याचा मला अभिमान आहे कारण ते कृत्य हे व्यक्तिगत हेव्यादाव्यातून येत नाही तर ते माझ्या भाषेसाठी आणि माझ्या मराठी माणसासाठी असतं. माझ्या दिवंगत आमदाराने पण विधानभवनात एका मुजोर आमदाराला दणका दिला होता, तो व्यक्तिगत द्वेषातून नव्हता तर मराठीला कमी लेखायचा प्रयत्न केला होता म्हणून. पण यांचं काय?
advertisement
काल विधानभवन परिसरात सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधी पक्षातील आमदार यांच्या कार्यकर्त्यांच्यात तुफान हाणामारी झाल्याची चित्रफीत पाहिली. ही चित्रफीत पाहून मला खरंच प्रश्न पडला, ' काय अवस्था झालीये आपल्या महाराष्ट्राची ?'
सत्ता हे साधन असावं साध्य नाही याचा विसर पडल्यामुळे…
— Raj Thackeray (@RajThackeray) July 18, 2025
advertisement
अचूक आकडेवारी जरी माझ्याकडे नसली तरी, एका जुन्या अंदाजानुसार अधिवेशनाच्या एका दिवसाचा खर्च हा किमान दीड ते दोन कोटी रुपये असतो. हे पैसे तुमच्या व्यक्तिगत शेरेबाजीसाठी वाया घालवायचे? महाराष्ट्रात इतके प्रश्न प्रलंबीत आहेत, राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे, कंत्राटदारांची देणी रखडली आहेत, जिल्ह्यांना विकास निधी मिळत नाहीये... सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि मंत्रीच प्रश्न विचारत आहेत की अधिवेशन ही औपचारिकता उरली आहे का? या सगळ्याकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून माध्यमांना खाद्य पुरवण्यासाठी या उथळ गोष्टी घडू दिल्या जात आहेत? आज अशा लोकांना जर माफ केलं गेलं तर यापुढे हे प्रमाण मानून भविष्यात विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही !
advertisement
माध्यमांमध्ये जे काही थोडे सूज्ञ आवाज उरलेत त्यांना विनंती आहे की या भंपक प्रकारणांच्यात तुम्हाला कितीही गुंतवायचा प्रयत्न झाला तरी त्यात अडकू नका आणि सरकारला पण माझं आव्हान आहे की जर थोडी जरी साधनशुचिता शिल्लक असेल तर तुमच्या स्वतःच्या लोकांवर पण कारवाई करून दाखवा. जर ती तुम्हाला करायची नसेल तर हरकत नाही, मग मात्र मुजोर मराठी द्वेष्ट्याना माझे महाराष्ट्र सैनिक हात सोडून सरळ करतील तेंव्हा आम्हाला अक्कल शिकवू नका.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 18, 2025 12:47 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Raj Thackeray : 'आमच्यावर तुटून पडणारे कुठं लपून बसलेत?', मीरा-भाईंदर दौऱ्याआधी राज ठाकरेंचे ट्वीट चर्चेत