एका भावाने शिंदेसेनेत आणलं, दुसऱ्या भावावर गंभीर आरोप, राजन तेली यांचा राणेंशी पंगा!
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Rajan Teli: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या कर्ज वाटपाच्या चौकशीची मागणी राजन तेलींनी केलीय. त्या प्रकरणी चौकशीचा ससेमिरा चुकवण्यासाठीचं तेलींनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याची चर्चा आहे.
मुंबई : दसरा मेळाव्यात राजन तेलींनी शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश केला अन् अवघ्या काही दिवसात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारण तापलं. जिल्हा बँकेतील कर्जवाटप घोटाळ्याच्या मागे मंत्री नितेश राणे असल्याचा आरोप राजन तेली यांनी केलाय. या आरोपामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या कर्ज वाटपाच्या चौकशीची मागणी राजन तेलींनी केलीय. त्या प्रकरणी चौकशीचा ससेमिरा चुकवण्यासाठीचं तेलींनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याची चर्चा आहे. राजन तेली हे यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षात होते. सावंतवाडी मतदारसंघात शिवसेनेच्या दीपक केसरकर यांच्याकडून ते पराभूत झाले होते. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राजन तेली यांनी पालकमंत्री नितेश राणेंवर आरोपांच्या फैरी डागल्यात.
advertisement
कर्ज वाटपामागे नितेश राणेच, राजन तेली यांनी खिंडीत गाठलं
अवघ्या चार दिवसांपूर्वीचं शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतलेल्या राजन तेली यांनी महायुतीतील भाजप मंत्री नितेश राणे यांच्यावर गंभीर आरोप करीत खळबळ उडवून दिलीय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारण ज्या बँकेभोवती फिरतं त्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेंच्या कर्जवाटपावर सवाल उपस्थित केलाय. कर्ज वाटपामागे नितेश राणेच आहेत असे सांगून त्यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न राजन तेली यांनी केली.
advertisement
कुरघोडीच्या राजकारणाची चर्चा
जिल्हा बँकेतील कर्ज वाटप प्रकरणी राजन तेलींनी मंत्री नितेश राणेंच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करतानाचं चौकशीची मागणी केलीय. राजन तेली यांनी शिंदेंच्या सेनेत दाखल झाल्यानंतर थेट महायुतीतील भाजप मंत्र्यांवरच आरोप केलेत. त्यामुळे जिल्ह्यातील कुरघोडीच्या राजकारणाची चर्चा रंगलीय.
राजन तेली यांचे आरोप निलेश राणे यांना मान्य आहेत का?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन जिल्हा बँक कर्ज वाटप घोटाळ्याची तक्रार करणार असल्याचेही राजन तेली यांनी सांगितले. महायुतीतील घटकपक्ष असलेल्या भाजपच्या मंत्र्यावर राजन तेली यांनी आरोप केल्यामुळे महायुतीत कोकणात चाललंय काय असा सवाल उपस्थित केला जातोय. राजन तेली यांचे हे आरोप शिवसेना आमदार निलेश राणे यांना मान्य आहेत का असा प्रश्न विचारला जातोय.
advertisement
मुलावर आरोप होताच नारायण राणे फडणवीस यांच्या भेटीला
राजन तेली यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेप्रकरणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तक्रार करणार असल्याचे सांगताच या खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली हे विशेष. एकूणच राजन तेलींच्या या आरोपामुळं कोकणात महायुतीत वादाची ठिणगी पडलीय इतकं नक्की.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 06, 2025 8:08 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
एका भावाने शिंदेसेनेत आणलं, दुसऱ्या भावावर गंभीर आरोप, राजन तेली यांचा राणेंशी पंगा!