रांजणगाव गणपती: करोडो रुपयांची जमीन हडपल्याचा गुन्हा असलेल्या स्वाती पाचुंदकर भाजपमध्ये!
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Swati Pachundkar: भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पाचुंदकर पती पत्नीने पक्षप्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर पाचुंदकर यांच्या पक्ष प्रवेशाने भाजपची शिरूरमध्ये ताकद वाढणार आहे.
शिरूर (पुणे): पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला असून पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शेखर पाचुंदकर यांच्यासह रांजणगाव देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा आणि माजी जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचुंदकर यांनी मुंबईत भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. स्वाती पाचुंदकर या सरपंच असताना ग्रामपंचायतीची ७२ गुंठे जागा हडपल्याचा गुन्हा त्यांच्या नावावर दाखल आहे. या प्रकरणात रांजणगाव ग्रामपंचायतीच्या लिपीक आणि ग्रामसेवकाला अटक झाली होती. मात्र स्वाती पाचुंदकर यांनी सर्वोच्च न्यायालयात जाऊन अटकपूर्व जामीन मिळवला.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पाचुंदकर दीर-भावजयने पक्षप्रवेश केला. यावेळी शेखर पाचुंदकर यांनी नाव न घेता दिलीप वळसे पाटील यांना जोरदार लक्ष्य केले. जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर पाचुंदकर यांच्या पक्ष प्रवेशाने भाजपची पुणे जिल्ह्यात ताकद वाढणार आहे.
पाचुंदकर यांच्यावर आरोप असलेला जमीन घोटाळा काय?
पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती ग्रामपंचायत हद्दीतील करोडो रुपये किमतीची सुमारे ७२ गुंठे शासकीय जमीन ग्रामपंचायत दप्तरात फेरफार करून आनंदराव पाचुंदकर यांच्या नावावर केल्याचे विविध शासकीय अहवालातून आणि कोर्टाच्या निर्णयातून सिद्ध झाले होते. सन २००९ ते २०१९ या कालावधीत हा सर्व अपहार झाला असून यादरम्यान २०१३ ते २०१७ या कालावधीत रांजणगावच्या सरपंच असणाऱ्या स्वाती पाचुंदकर यांच्या काळात हा अपहार झाल्याचे उच्च न्यायालयाच्या निकालात म्हटले आहे.
advertisement
या संपूर्ण प्रकरणात रांजणगाव ग्रामपंचायतीचे दप्तर तपासणी करणारे शिरूर तालुका पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बाळासाहेब गावडे यांनी याबाबत तत्कालीन सरपंच स्वाती पाचुंदकर यांचे सह अजून एक महिला सरपंच, तीन ग्रामसेवक आणि एका लिपिकावर ठपका ठेवत रांजणगाव पोलिसांत फिर्याद दिली होती. गावडे यांच्या फिर्यादीवरून रांजणगाव पोलिसांनी या सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी तत्कालीन ग्रामसेवक हनुमंत चव्हाण यांना आणि लिपीक संतोष शिंदे यांना अटक केली. सध्या ते जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत.
advertisement
सन १९६० - ६१ व सन २००८ - ०९ च्या रजिस्टर मधे फेरफार करून, खाडाखोड करून, नवीन पान चिकटवून, अतिरिक्त व अनियमीत नोंदी करून गावठाणातील ७२ गुंठे जागेवर आनंदराव दिनकर पाचुंदकर यांचे नाव नोंदविले होते. आनंदराव पाचुंदकर हे तत्कालीन सरपंच स्वाती पाचुंदकर यांचे सासरे असून, या गुन्ह्यात नुकतेच नाव समाविष्ट केलेल्या दत्तात्रेय पाचुंदकर यांचे वडील आहेत.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
October 15, 2025 6:09 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
रांजणगाव गणपती: करोडो रुपयांची जमीन हडपल्याचा गुन्हा असलेल्या स्वाती पाचुंदकर भाजपमध्ये!