आईचा मृतदेह घरात, पण लेक पेपरला सामोरी; सई सावंतची जिद्द पाहून नियतीही हरली
- Published by:Prachi Amale
Last Updated:
घरात आईचा मृतदेह समोर असताना मनावर दगड ठेवून आणि डोळ्यांतील अश्रूंना वाट करून देत सई परीक्षेला सामोरी गेली.
रत्नागिरी : दहावीची परीक्षा म्हणजे कोणत्याही विद्यार्थ्याच्या आयुष्यातील पहिला मोठा टप्पा असतो. या परीक्षेचा शेवटचा पेपर देऊन बाहेर पडताना चेहऱ्यावर जो आनंद असायला हवा, तो सई संतोष सावंत हिच्या नशिबात नव्हता. 18 मार्च रोजी दहावीचा शेवटचा पेपर असताना, त्याच्या आदल्या दिवशीच नियतीने सईवर क्रूर घाला घातला. तिच्या मायेचे छत्र हरपले आईचे अचानक निधन झाले. घरात आईचा मृतदेह समोर असताना मनावर दगड ठेवून आणि डोळ्यांतील अश्रूंना वाट करून देत सई परीक्षेला सामोरी गेली. तिच्या या अफाट धैर्याने आज संपूर्ण गाव सुन्न झाले आहे.
शिवडाव माध्यमिक विद्यालयातील सई संतोष सावंत ही एक हुशार आणि कष्टाळू विद्यार्थिनी. 18 मार्च रोजी तिचा दहावीचा शेवटचा पेपर होता. मात्र, 17 मार्च रोजी तिच्या आईला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सावंत कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. हसत्या-खेळत्या घरातील आईचा आधार कायमचा गेल्याने सई पूर्णपणे खचून जाणे स्वाभाविक होते.
advertisement
आईच्या स्वप्नासाठी परीक्षेचा निर्धार
अशा परिस्थितीत कोणताही सामान्य माणूस कोलमडून पडला असता, पण सईने विलक्षण संयम दाखवला. माझ्या मुलीने शिकावे आणि मोठे व्हावे, हे आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने परीक्षेला बसण्याचा निर्धार केला. 18 मार्च रोजी सकाळी घरात आईच्या अंत्यविधीची तयारी सुरू असताना सईने हातात पेन आणि हॉलतिकीट घेतले. मनात भावनांचा कल्लोळ माजला असताना ती शिवडाव विद्यालयातील परीक्षा केंद्रावर पोहोचली.
advertisement
आयुष्यातील अत्यंत कठीण प्रसंगातही तिने दाखवलेल्या धैर्याने सर्वांचेच मन हेलावून गेले आहे.
दु:ख मनात ठेवून दिला पेपर
सईच्या या धैर्याला शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांनी मोठे पाठबळ दिले. शाळेच्या वतीने तिला केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात आली. परीक्षा हॉलमध्ये पेपर लिहिताना सईच्या डोळ्यांतून सतत अश्रू वाहत होते, पण तिचे हात थांबले नाहीत. पेपर देताना तिला अनेकदा आईच्या आठवणीने हुंदका दाटून येत होता. पण त्याही परिस्थितीत तिने आपला पेपर सोडवला. तिने शांतपणे आपला शेवटचा पेपर पूर्ण केला. पेपर संपवून ती जेव्हा बाहेर पडली, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे ओलावले होते. पेपर संपवून ती थेट आईच्या अंत्यविधीसाठी घरी रवाना झाली.
advertisement
Location :
Ratnagiri,Maharashtra
First Published :
Mar 18, 2026 8:36 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आईचा मृतदेह घरात, पण लेक पेपरला सामोरी; सई सावंतची जिद्द पाहून नियतीही हरली










