बापाचं छत्र हरपलं, घरात अठराविश्व दारिद्र्य; पण जिद्दीच्या जोरावर मिटकी गावचा हिरा बनला 'IPS', हत्तीवरून निघाली मिरवणूक
- Reported by:ASIF MURSAL
- Published by:Prachi Amale
Last Updated:
आटपाडी बस स्थानक ते पोलीस स्टेशन चौकापर्यंत प्रवीणची हत्तीवरून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
सांगली: सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुका म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो दुष्काळी भाग. पण याच मातीतील एका जिद्दी तरुणाने गरिबी आणि संकटावर मात करत यशाला गवसणी घातली आहे. आटपाडी तालुक्यातील मिटकी गावचा सुपुत्र प्रवीण उत्तम कोळपे याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत 584 वा रँक मिळवून चक्क आयपीएस (IPS) पदाला गवसणी घातली आहे. त्याच्या या ऐतिहासिक यशाचा जल्लोष आज संपूर्ण आटपाडीने अनुभवला, जिथे एका कष्टकरी आईच्या लेकाची मिरवणूक चक्क हत्तीवरून काढण्यात आली.
प्रवीणचा हा प्रवास सोपा नव्हता. घरात अठराविश्व दारिद्र्य आणि लहानपणीच वडिलांचे छत्र हरपलेले. आईने कष्ट करून आणि परिस्थितीशी दोन हात करत प्रवीणला शिकवले. अनेकदा पदरी निराशा आली, पण परिस्थितीला दोष देण्यापेक्षा ती बदलण्याची ताकद स्वतःच्या मनगटात निर्माण करणे हाच ध्यास प्रवीणने ठेवला होता. आज जेव्हा तो आयपीएस बनून आपल्या मातीत परतला, तेव्हा त्याच्या डोळ्यांतील अश्रू आईच्या कष्टाचे चीज झाल्याची साक्ष देत होते.
advertisement
हत्तीवरून मिरवणूक अन् पडळकरांची साखर
प्रवीणच्या यशाचे कौतुक करण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर स्वतः रस्त्यावर उतरले. आटपाडी बस स्थानक ते पोलीस स्टेशन चौकापर्यंत प्रवीणची हत्तीवरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलाल उधळत संपूर्ण बाजारपेठ न्हाऊन निघाली होती. विशेष म्हणजे, आमदार पडळकर यांनी स्वतः हातात साखरेची बादली घेऊन पेठेतील नागरिक आणि व्यापाऱ्यांचे तोंड गोड केले. एका बहुजन समाजातील तरुणाने मिळवलेले हे यश आटपाडीच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले आहे.
advertisement
गोपीचंद पडळकर नेमकं का. म्हणाले?
यावेळी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर भावूक झाले. ते म्हणाले, आजकालचे अनेक तरुण आपल्या आई-वडिलांना किंवा परिस्थितीला दोष देतात. पण प्रवीणने सिद्ध केले की, जर जिद्द असेल तर परिस्थितची देखील तुमच्या आड येऊ शकत नाही. बहुजन समाजातील प्रत्येक तरुणाने प्रवीणचा आदर्श घेऊन आयएएस, आयपीएस बनण्याचे स्वप्न पाहावे, यासाठीच आम्ही हा हत्तीवरून मिरवणुकीचा अनोखा सोहळा आयोजित केला आहे.
advertisement
प्रवीण कोळपेचे हे यश केवळ त्याचे वैयक्तिक यश नसून, ते स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक ग्रामीण तरुणाच्या आकांक्षेचे प्रतीक आहे.
हे ही वाचा :
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
Mar 14, 2026 5:41 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बापाचं छत्र हरपलं, घरात अठराविश्व दारिद्र्य; पण जिद्दीच्या जोरावर मिटकी गावचा हिरा बनला 'IPS', हत्तीवरून निघाली मिरवणूक










