मध्यरात्री गाठलं, गुप्ती आणि तलवारीने केले वार, पहिलवानाच्या खुनाने सांगली हादरली!
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Sangli: सांगली जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यातील कार्वे गावात एका ३५ वर्षीय पहिलवानाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. टोळक्याने गुप्ती अन् तलवारीने वार करत पहिलवानाचा जीव घेतला आहे.
असिफ मुरसल, प्रतिनिधी सांगली : सांगली जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यातील कार्वे गावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथे एका ३५ वर्षीय पहिलवानाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. आरोपी टोळक्याने गुरुवारी मध्यरात्री विटा तासगाव रस्त्यावरील पुलावर पहिलवानाला गाठून त्याची हत्या केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतलं आहे.
राहुल गणपती जाधव असं हत्या झालेल्या ३५ वर्षीय पहिलवानाचं नाव आहे. तो खानापूर तालुक्यातील कार्वे गावात राहतो. गुरुवारी मध्यरात्री जुन्या भांडणाच्या रागातून त्याची हत्या केल्याचं समोर आलं आहे. गुरुवारी रात्री बाराच्या सुमारास राहुल जाधव हे कार्वे येथील स्मशानभूमी जवळ असलेल्या विटा तासगाव रस्त्यावरील पुलावर होते. यावेळी अचानक याठिकाणी हल्लेखोर टोळकं आलं. त्यांनी गुप्ती आणि तलवारीच्या सहाय्याने राहुलवर सपासप वार केले. एवढेच नव्हे तर त्यांनी हॉकी स्टीकने मारहाण करत पहिलवान राहुल जाधव याची निर्घृण हत्या केली आहे.
advertisement
माणिक संभाजी परीट, गजानान गोपीनाथ शिंदे, अमृत शहाजी माळी, नयन रंगलाल धाबी, प्रफुल्ल कांबळे, रोहन रघुनाथ जाधव आणि नितीन पांडुरंग जाधव यांनी हा हल्ला केल्याचा आरोप राहुल जाधव यांच्या भावाने केला आहे. यातील माणिक परीट, गजानन शिंदे आणि नयन धाबी या तीन संशयितांना ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, पहिलवान राहुल जाधव आणि संशयित आरोपी यांच्यात जुना वाद आहे. याच वादातून संशयितांनी राहुल जाधव यांच्या चारचाकीच्या काचा फोडल्या. तलवारीने डोक्यात वार करुन खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील आणि पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सर्व संशयितांवर गुन्हा दाखल केला असून फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही. जे. येळेकर करीत आहेत.
view commentsLocation :
Sangli,Maharashtra
First Published :
January 17, 2025 6:53 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
मध्यरात्री गाठलं, गुप्ती आणि तलवारीने केले वार, पहिलवानाच्या खुनाने सांगली हादरली!


