Sanjay Raut : दिल्लीत काँग्रेस-आपचं कुठं फिस्कटलं? आदित्यला केजरीवालांनी सगळंच सांगितलं
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Sanjay Raut On Congress AAP : दिल्लीत आप आणि काँग्रेसचं कुठं फिस्कटलं याचा गौप्यस्फोट झाला आहे. काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती. या भेटीत केजरीवाल यांनी धक्कादायक गौप्यस्फोट केले आहे.
मुंबई: दिल्लीत विधानसभा निवडणुकीत भाजपने आम आदमी पक्षाचा पराभव करत 27 वर्षांनी सत्तेत पुनरागमन केले. आप आणि काँग्रेसची आघाडी झाली असती तर निकालाचे चित्र वेगळे असते असा सूर इंडिया आघाडीतील काही घटक पक्षांनी लावला होता. दिल्लीत आप आणि काँग्रेसचं कुठं फिस्कटलं याचा गौप्यस्फोट झाला आहे. काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती. या भेटीत केजरीवाल यांनी धक्कादायक गौप्यस्फोट केले आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी दैनिक सामनातील रोखठोक या सदरात आदित्य ठाकरे आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात काय घडलं याची माहिती देताना संभाषणही सांगितले आहे. इंडिया आघाडीत होत असलेली पडझड ही भाजपच्या फायद्याची असून त्याचे परिणाम संपूर्ण देशाला भोगावे लागतील असा इशाराही संजय राऊत यांनी दिला.
advertisement
काँग्रेसने काय म्हटले?
संजय राऊत यांनी काँग्रेस नेते अजय माकन यांनी 'आप'मुळे निवडणुकीत आघाडी झाली नसल्याचे म्हटल्याचा संदर्भ दिला. हरयाणा आणि दिल्लीत ‘आप’शी समझोता झाला नाही याचे खापर काँग्रेसवर फोडले जाते ते तितकेसे बरोबर नसल्याचे माकन यांनी म्हटले.
माकन यांनी काय म्हटले?
अजय माकन यांनी म्हटले की, “हरयाणा विधानसभा निवडणुकांच्या वेळी काँग्रेसने पुढाकार घेऊन ‘आप’शी एकत्र निवडणुका लढण्यासंदर्भात चर्चा सुरू केली. आम्ही त्यांना चार जागा देत होतो. त्यांनी सहा जागा मागितल्या. प्रश्न चार किंवा सहा जागांचा नव्हता. तो विषय चर्चेतून सुटलाच असता, पण इतक्यात केजरीवाल हे जामिनावर सुटले. ते तुरुंगाच्या बाहेर पडले व दुसऱ्याच दिवशी त्यांनी घोषणा केली की, हरयाणातल्या सर्व 90 जागा आम्ही लढवणार आहोत. तर ही सुरुवात राहुल गांधींनी नाही केली. हरयाणा निवडणुकीपासून ही सुरुवात केजरीवाल यांनी केली. हे योग्य नव्हते. लोकसभेत आम्ही एकत्र होतो, पण लोकसभा निवडणुका संपताच गोपाल राय यांनी सगळ्यात आधी घोषणा केली की, आता आमची काँग्रेसबरोबरची आघाडी तुटली आहे. दिल्ली विधानसभेच्या 70 जागा आम्ही एकटे लढणार. त्यानंतर ‘आप’चा प्रत्येक नेता हेच बोलत राहिला. तुम्ही काँग्रेसला दोष का देता?” असा प्रश्न माकन यांनी केला असल्याचे संजय राऊतांनी आपल्या लेखात म्हटले.
advertisement
काँग्रेससोबत युती का नाही? केजरीवालांनी सगळं सांगितलं...
संजय राऊत यांनी आपल्या लेखात ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांच्यात झालेल्या संभाषणाचा दाखला दिला आहे. “काँग्रेसबरोबर युती झाली असती तर बरे झाले असते. केजरीवाल यांनी युती होऊ दिली नाही असा आक्षेप आहे.” “नाही. मी पूर्णपणे काँग्रेसबरोबर एकत्र निवडणुका लढण्याच्या बाजूने होतो,” केजरीवाल. “मग काय घडले?” “मी तुरुंगात असताना हरयाणाच्या निवडणुका झाल्या. राघव चड्डा हरयाणाचे काम पाहत होते. ते मला तुरुंगात भेटायला आले. मी त्यांना सांगितले, आपल्याला काँग्रेसबरोबर आघाडी करायलाच हवी. जागा वाटपाचे तुम्ही ठरवा,” केजरीवाल. “मग गाडं अडलं कुठे?” “काँग्रेसने आमच्याकडे यादी मागितली. आम्ही 14 मतदारसंघांची यादी दिली. राहुल गांधी म्हणाले, आम्ही ‘आप’ला सहा जागा देऊ. मी राघवला म्हणालो, हरकत नाही सहा जागा घ्या. आम्ही दोन पावले मागे आलो. गांधी म्हणाले, के.सी. वेणुगोपालना भेटा. ते फायनल करतील. राघव के.सी. वेणुगोपालांना भेटले. ते म्हणाले, सहा जागा शक्य नाही. आम्ही चार जागा देऊ. तुम्ही आमचे हरयाणाचे प्रभारी बावरियांना भेटा. चड्डा मला तुरुंगात भेटायला आले. मी म्हणालो, ठीक आहे. चार जागा घ्या. चड्डा बावरियांना भेटायला गेले तर त्यांनी चारचा प्रस्तावच उडवून लावला. म्हणाले, आम्ही तुम्हाला दोन जागाच देऊ. मी पुन्हा चड्डांना निरोप दिला. ठीक आहे. दोन जागा घ्या. राहुल गांधी हे बॉस असताना व त्यांनी शब्द देऊनही आम्हाला सहा जागा मिळाल्या नाहीत. चारवरून दोनवर आलो. त्या दोन जागांसाठी चड्डा हे शेवटी भूपेंद्र हुड्डांना भेटले. तेव्हा त्यांनी भाजपचे गड असलेल्या भागातील दोन जागा आम्हाला देऊ केल्या. ही काँग्रेसची ‘युती’ धर्माची व्याख्या. आम्ही काय करणार? हे झाले हरयाणाचे. दिल्लीतही वेगळे घडले नाही. त्यांना भाजपला हरवायचे नव्हते. त्यांना मोदीविरोधक केजरीवालना हरवायचे होते. हे सर्व सांगताना केजरीवाल यांची व्यथा चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. महाराष्ट्रानेदेखील हा अनुभव घेतला असल्याचे संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक सदरात म्हटले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 16, 2025 9:34 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sanjay Raut : दिल्लीत काँग्रेस-आपचं कुठं फिस्कटलं? आदित्यला केजरीवालांनी सगळंच सांगितलं